मुंबई – मंगळवारी रुपयाचा भाव ऐतिहासिक निचांकी पातळीवर गेला होता. बुधवारी रिझर्व बँकेने चलन बाजारात हस्तक्षेप केला असलचे बोलले जाते. यामुळे बुधवारी रुपयाचा भाव 55 पैशांनी वाढून 90.38 रुपये प्रति डॉलर या पातळीवर जाण्यास मदत झाली. मात्र चलन बाजारातील अस्थिरता अजूनही संपलेली नसल्याचे मत विश्लेषकांनी व्यक्त केले. भारतीय रुपयाचे मूल्य सध्या देशांतर्गत परिस्थितीमुळे घसरत नाही तर याला परदेशातील बाबी कारणीभूत आहेत. परदेशातील परिस्थिती आगामी काळ अनिश्चित राहणार असल्यामुळे रुपयाच्या मूल्यावर काही काळ तरी प्रभाव कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भारत -अमेरिकेदरम्यानचा व्यापार करार लांबणीवर पडल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात विक्री करीत आहेत. त्याचाही रुपयांच्या मूल्यावर परिणाम झाला आहे. मात्र दरम्यानच्या काळात खनिज तेलाच्या किमती बर्याच कमी झाल्यामुळे रुपयाची जास्त हानी झाली नसल्याचे विश्लेषकांनी नमूद केले. या घटनाक्रमावर प्रतिक्रिया व्यक्त करताना एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले की, पाच दिवसापासून रुपयाची एकतर्फी घसरण होत होती. अशा परिस्थितीत रिझर्व बँकेने हस्तक्षेप केला असल्याचे दिसून येते. एकूण परिस्थिती पाहता 89.70 रुपये प्रति डॉलर या पातळीवर रुपयाला चांगला आधार असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेच्या रिझर्व बँकेने केलेल्या व्याजदर कपातीमुळे डॉलर कमकुवत होत असून महत्त्वाच्या सहा चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स सध्या 98.56 अंकावर आहे. मात्र डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरत आहे. जानेवारीपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य तब्बल सहा टक्क्यांनी कमी झाले आहे. आशिया खंडातील इतर कोणत्याही देशाच्या चलनापेक्षा डॉलरची जास्त हानी या कालावधीत झाली आहे. याला परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची शेअर आणि रोखे बाजारातील विक्री कारणीभूत आहे. हे गुंतवणूकदार डॉलरमध्ये नफा काढून घेत आहेत. मंगळवारी या गुंतवणूकदारांनी 2,381 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. जोपर्यंत भारत आणि अमेरिकेचा व्यापार करार होत नाही. तोपर्यंत रुपयाचे मूल्य स्थिर होण्याची शक्यता कमी आहे. हा करार करण्यासाठी भारत सरकार आपल्या परीने प्रयत्न करीत असल्याचे सांगितले जाते.