नवी दिल्ली – दूरसंचार मंत्रालयाने मोबाईल कंपन्यांना मोबाईल तयार करताना संचार साथी हे मोबाईल अॅप मोबाईलमध्ये उपलब्ध करण्याची सूचना केली होती. याला बर्याच ग्राहकांनी आणि मोबाईल कंपन्यांनी हरकत सूचित केल्यानंतर दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, ग्राहकांना संचारसाथी हे अॅप डिलीट करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. जोपर्यंत ग्राहक हे अॅप पुन्हा डाऊनलोड करणार नाहीत तोपर्यंत हे अॅप काम करणार नाही. संसद भवन परिसरात या संदर्भात पत्रकारांनी सिंधिया यांना प्रश्न विचारला असता सिंधिया यांनी सांगितले की, ग्राहकांना हे अॅप वापरण्याचे बंधन असणार नाही. मात्र सरकारने ग्राहकांची डिजिटल सुरक्षा व्हावी या दृष्टिकोनातून हे अॅप विकसित केले आहे. 28 नोव्हेंबर रोजी दूरसंचार विभागाने मोबाईल कंपन्यांना मोबाईल तयार करतानाच हे अॅप मोबाईल मध्ये उपलब्ध करण्याची सूचना केली होती. त्याचबरोबर जुन्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर अपडेट करताना संचारसाठ हे अॅप त्यामध्ये समाविष्ट करावे अशी सूचना केली होती. हा ग्राहकांच्या व्यक्तिगत सुरक्षेवर अतिक्रमण करण्याचा प्रकार असल्याची टीका काही राजकीय पक्षांनी केली होती. मात्र आम्ही फक्त हे अॅप प्रत्येकाला उपलब्ध व्हावे याची काळजी घेण्यासाठी तसा निर्णय घेतला होता. ग्राहकांना जर त्यांची डिजिटल सुरक्षा असुरक्षित आहे असे वाटत असे वाटले तर ग्राहक हे अॅप डिलीट करू शकतात असे सिंधिया यांनी स्पष्ट केले. भारतात सायबर गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्याच दृष्टिकोनातून आम्ही हा पुढाकार घेतला आहे असे सिंधिया म्हणाले.