नवी दिल्ली : मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांनी ग्राहकांच्या सोयीसाठी एक करार केला आहे. या भागीदारीमुळे आता मारुती सुझुकीच्या गाड्यांची सर्व्हिसिंग थेट इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपांवर उपलब्ध होणार असून, यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ग्राहकांना जिथे इंधन भरण्याची सुविधा मिळते, त्याच ठिकाणी आता आपल्या गाडीची देखभालही करता येणार आहे. या उपक्रमांतर्गत ग्राहकांना गाडीचे रुटीन मेंटेनन्स, छोट्या-मोठ्या दुरुस्त्या आणि इतर तांत्रिक सेवांचा लाभ घेता येईल. मारुती सुझुकीचे सध्या देशभर ५,७८० हून अधिक सर्व्हिस टचपॉइंट्स आहेत, मात्र इंडियन ऑईलच्या ४१,००० पेक्षा जास्त पेट्रोल पंपांच्या नेटवर्कमुळे ही सेवा आता दुर्गम भागातील ग्राहकांपर्यंतही सहज पोहोचू शकणार आहे. मारुती सुझुकीचे कार्यकारी अधिकारी राम सुरेश अकेला यांनी सांगितले की, ग्राहकांसाठी कार सर्व्हिसिंग प्रक्रिया अधिक सोपी आणि सोयीस्कर बनवणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे. इंडियन ऑईलचे संचालक सौमित्र पी. श्रीवास्तव यांनी या भागीदारीवर भाष्य करताना म्हटले की, पेट्रोल पंपांवर केवळ इंधन न विकता ग्राहकांना व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस देणे ही काळाची गरज आहे. या करारामुळे दोन्ही कंपन्यांच्या व्यवसायाला गती मिळेल आणि ग्राहकांचा वेळही वाचेल. देशातील प्रवासी वाहन बाजारपेठेत सुमारे ३९ टक्के वाटा असलेल्या मारुती सुझुकीसाठी हे पाऊल आपले विक्रीपश्चात सेवा नेटवर्क अधिक मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.