Hurun Rich List 2026: ह्युरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२६ नुसार भारतातील अब्जाधीशांची संख्या आता ३०८ वर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २४ अब्जाधीश अधिक झाल्यामुळे भारत या यादीत अमेरिका आणि चीननंतर जगात तिसऱ्या स्थानावर झेपावला आहे. गेल्या एक वर्षात भारतात ५७ नवे अब्जाधीश तयार झाले. अमेरिका आणि चीननंतर ही संख्या जगात सर्वाधिक आहे. मात्र याच काळात २७ जण या यादीतून बाहेर पडले. एकूण भारतीय अब्जाधीशांची संपत्ती मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १०% वाढून ११२.६ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यातील १९९ अब्जाधीशांची संपत्ती वाढली, तर १०९ जणांच्या संपत्तीत घट किंवा स्थिरता दिसून आली. अंबानी पुन्हा अव्वल, अदानींची घसरण – रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे ९.८ लाख कोटी रुपये असून गेल्या वर्षाच्या तुलनेत ९% वाढ नोंदविली आहे. अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी दुसऱ्या स्थानावर असले, तरी त्यांच्या संपत्तीत सुमारे १४% घट होऊन ती ७.५ लाख कोटी रुपयांवर आली आहे. तिसऱ्या स्थानावर एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या अध्यक्षा रोशनी नाडर मल्होत्रा आहेत. त्यांची संपत्ती सुमारे ३.२ लाख कोटी रुपये आहे. भारतातील शीर्ष १० श्रीमंतांमध्ये त्या एकमेव महिला आहेत. आरोग्य क्षेत्रातून सर्वाधिक नवे अब्जाधीश – यंदा सर्वाधिक नवे अब्जाधीश आरोग्यसेवा क्षेत्रातून पुढे आले. या क्षेत्रातून ५३ नवी नावे यादीत समाविष्ट झाली. त्यापाठोपाठ औद्योगिक उत्पादन क्षेत्रातून ३६ आणि ग्राहक वस्तू क्षेत्रातून ३१ नवे अब्जाधीश आले. संपत्तीच्या बाबतीत मात्र ऊर्जा क्षेत्र आघाडीवर राहिले. या क्षेत्रातील केवळ ८ अब्जाधीशांकडे एकत्रित १८.३ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे, जी भारताच्या एकूण अब्जाधीश संपत्तीच्या सुमारे १६% आहे. पूनावाला सर्वाधिक संपत्ती वाढविणारे – पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक व अध्यक्ष सायरस एस. पूनावाला यांनी एका वर्षात सुमारे ०.९१ लाख कोटी रुपयांची संपत्ती जोडत सर्वाधिक संपत्ती वाढविणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकाविले. मुंबई अजूनही अव्वल; सर्वात तरुण अब्जाधीश ३२ वर्षांचे – मुंबई हे भारतातील सर्वात मोठे अब्जाधीश केंद्र आहे. शहरात एकूण ९५ अब्जाधीश राहतात. यंदा मुंबईत १५ नवे अब्जाधीश तयार झाले. हे प्रमाण न्यूयॉर्क (१४) आणि लंडन (९) पेक्षाही अधिक आहे. मात्र आशियाच्या अब्जाधीश केंद्र म्हणून मुंबईची जागा आता चीनच्या शेन्झेन शहराने घेतली आहे, जेथे १३३ अब्जाधीश आहेत. जागतिक शहरांमध्ये न्यूयॉर्क १४६ अब्जाधीशांसह आघाडीवर असून त्यापाठोपाठ शांघाय, बीजिंग आणि लंडन आहेत. भारताचे सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल (वय ३२) यांची नोंद झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती सुमारे १४,४४० कोटी रुपये आहे. २३ महिला अब्जाधीश – भारतात सध्या २३ महिला अब्जाधीश असून त्यांची एकूण संपत्ती सुमारे ९.८ लाख कोटी रुपये आहे. एकूण अब्जाधीशांमध्ये महिलांचे प्रमाण सुमारे ७% आहे. ह्युरुन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मते, भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत होणारी सातत्यपूर्ण वाढ ही देशातील उद्योजकता, मजबूत आर्थिक विकास आणि जागतिक स्तरावर भारतीय व्यावसायिकांचा वाढता प्रभाव दर्शवते.