बंगळुरू – सॉफ्टवेअर निर्यातदार इन्फोसिस कंपनीला तिसर्या तिमाहीत झालेला नफा 2.2 टक्क्यांनी कमी होऊन 6,654 कोटी रुपये इतका झाला आहे. तर या तिमाहीत कंपनीचा महसूल 8.89 टक्क्यांनी वाढवून 45,479 कोटी रुपये इतका झाला आहे. कंपनीला या तिमाहीत अपवादात्मक बाब म्हणून नव्या कामगार कायद्यातील कामगार संहिताच्या अंमलबजावणीसाठी 1,289 कोटी रुपयांचा खर्च करावा लागला आहे. टीसीएस कंपनीलाही या तिमाहीत कामगार संहिताच्या अंमलबजावणीसाठी 2,128 कोटी रुपयाचा तर एचसीएल टेक कंपनीला या कारणासाठी 719 कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. यामुळे या कंपन्यांच्या नफ्यात या तिमाहीत घट झाली आहे. मात्र ज्या अर्थी या सर्व कंपन्यांचा महसूल वाढत आहे, त्या अर्थी या कंपन्यांची आर्थिक परिस्थिती बळकट आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर जास्त नकारात्मक परिणाम झालेला नाही. इन्फोसिस कंपनीने आशावाद कायम ठेवला असून संपूर्ण वर्षासाठीचा महसूल 3. 5% पर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या अगोदर कंपनीने हा महसूल तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली होती. जागतिक आर्थिक खराब परिस्थितीनंतरही भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा महसूल वाढत असल्याचे दिसून येत आहे. या ताळेबंदाबाबत बोलताना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांनी सांगितले की, कामगार संहितासाठी अधिक तरतूद करावी लागली. अन्यथा कंपनीच्या ताळेबंदावर परिणाम झालेला नाही. कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्तेसह इतर तंत्रज्ञानात प्रशिक्षण देण्यासाठी मोहीम उघडली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. कंपनीला या तिमाहीत 4.8 अब्ज डॉलरचे मोठे कंत्राट मिळाले आहे. त्यामुळे आगामी तिमाहीत कंपनीचा महसूल आणि नफा वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या तिमाहीत कंपनीची कामगार संख्या 5,043 वाढून 3 लाख 37 हजार 34 इतकी झाली आहे.