नवी दिल्ली – काही वर्षांपूर्वी संयुक्त अरब अमीरात भारतीय पर्यटकांसाठी नववर्षासाठी आकर्षणाचे केंद्र होते. मात्र यावर्षी नवीन वर्षात भारतातील पर्यटक व्हिएतनाम आणि थायलंडकडे जास्त प्रमाणात जात असल्याचे दिसून येते. मेक माय ट्रिप या कंपनीकडे आतापर्यंत परदेशी पर्यटनासाठी जी नोंदणी झाली आहे त्यावरून भारतीय पर्यटक आता थायलंडकडे जास्त प्रमाणात वळत असल्याचे सांगितले जाते. 20 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान पर्यटनासाठी बुकिंग केलेल्या पर्यटकांच्या माहितीवरून या कंपनीने सांगितले की अगोदर अडीच ते पाच हजार रुपये प्रति रात्र या प्रकारात जास्त बुकिंग होत होते. मात्र आता पाच हजार ते साडेसात हजार रुपये प्रति रात्र राहण्यासाठी जास्त प्रमाणात खर्च केला जात असल्याचे आम्हाला आढळून आले आहे. नवीन वर्षाच्या पर्यटनासाठी देशात गोवा, जयपुर आणि उदयपूर या शहराकडे पर्यटकांचा जास्त ओढा आहे. पहिल्या क्रमांकाची नोंदणी थायलंडसाठी झालेली आहे. अगोदर पहिल्या क्रमांकावर संयुक्त अरब अमिरात राहत होती. दुसर्या क्रमांकावर संयुक्त अरब अमिरात असून व्हिएतनाम तिसर्या क्रमांकावर गेला आहे. व्हिएतनाम आणि थायलंडने भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बर्याच उपाययोजना केल्या आहेत. भारतीय पर्यटकांना व्हिसा सहज उपलब्ध होतो हे त्यापैकी एक कारण आहे. निसर्गरम्य पर्यटन स्थळांना भेटी देणे, आराम त्याचबरोबर अध्यात्मिक कारणासाठीही पर्यटन वाढत असल्याचे दिसून येते. व्हिएतनाममध्ये आता बरेच भारतीय कर्मचारी काम करीत आहेत. त्यामुळेही व्हिएतनामकडे जाणार्या पर्यटकांचा ओढा वाढला आहे असे मेक माय ट्रिप चे सहसंस्थापक राजेश मागो यांनी सांगितले.