Share Market Today: भारतीय शेअर बाजारात आज ९ जानेवारी रोजी सलग पाचव्या दिवशी मोठी पडझड पाहायला मिळाली. सलग पाच दिवस सुरू असलेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण असून बाजारातून तब्बल १३ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. आज व्यवहाराच्या शेवटी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६०५ अंकांच्या म्हणजेच ०.७२ टक्क्यांच्या घसरणीसह ८३,५७६ च्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १९३ अंकांनी किंवा ०.७५ टक्क्यांनी घसरून २५,६८३ वर स्थिरावला. या संपूर्ण आठवड्यात सेन्सेक्समध्ये २,१८६ अंकांची म्हणजेच जवळपास २.५ टक्क्यांची मोठी घसरण नोंदवली गेली आहे. या पडझडीचा सर्वाधिक फटका बीएसईवर सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांच्या बाजार भांडवलाला बसला असून गेल्या पाच दिवसांत ही रक्कम १३ लाख कोटी रुपयांनी कमी झाली आहे. केवळ आजच्या एका दिवसाचा विचार केला तर गुंतवणूकदारांचे ६.४० लाख कोटी रुपये बुडाले आहेत. बीएसईचे एकूण बाजार भांडवल आदल्या दिवशीच्या ४७२.२५ लाख कोटी रुपयांवरून घसरून आज ४६७.८० लाख कोटी रुपयांवर आले आहे. ब्रॉडर मार्केटमध्येही आज मोठी विक्री दिसून आली, ज्यामध्ये मिडकॅप निर्देशांक ०.९ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक १.७ टक्क्यांपर्यंत कोसळला. आयटी आणि बँकिंग क्षेत्र वगळता एफएमसीजी, रियल्टी आणि कन्झ्युमर ड्युरेबल शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ ९ शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्ये एशियन पेंट्सच्या शेअरमध्ये १.३६ टक्क्यांची सर्वाधिक वाढ झाली, तर त्यापाठोपाठ एचसीएल टेक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इटरनल या कंपन्यांचे शेअर्स किरकोळ नफ्यात राहिले. याउलट २१ शेअर्समध्ये मोठी विक्री झाली, ज्यात एनटीपीसी २.३४ टक्क्यांच्या घसरणीसह टॉप लूझर ठरला. त्यासोबतच आयसीआयसीआय बँक, अदानी पोर्ट्स, भारती एअरटेल आणि सन फार्मा यांच्या शेअर्समध्ये १.४० टक्क्यांपासून २.२२ टक्क्यांपर्यंत पडझड झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर आज एकूण ४,३४२ शेअर्समध्ये व्यवहार झाले. यामध्ये वाढ नोंदवणाऱ्या १,०६६ शेअर्सच्या तुलनेत घसरण झालेल्या शेअर्सची संख्या ३,१०० इतकी मोठी होती. १७६ शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. बाजारातील अस्थिरतेचा अंदाज यावरून लावता येतो की, ७३ शेअर्सनी आज ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला असला तरी, ३२६ शेअर्स त्यांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. ‘ही’ 5 मुख्य कारणे ठरली कारणीभूत – १. परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय (FII Selling) शेयर बाजारातील घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) केलेली तुफान विक्री. गुरुवारी परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे ३,३६७ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. विशेष म्हणजे, गेल्या चार दिवसांपासून ही विक्री सुरूच आहे. एकट्या जानेवारी महिन्यात आतापर्यंत ८,०१७.५१ कोटी रुपयांचा निधी भारतीय बाजारातून बाहेर गेला आहे. २. अमेरिकेतील ‘टॅरिफ’ निकालाकडे जगाचे लक्ष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या आयात शुल्काच्या (Tariffs) वैधतेवर तेथील सर्वोच्च न्यायालय आज मोठा निकाल देणार आहे. जर न्यायालयाने हे टॅरिफ बेकायदेशीर ठरवले, तर अमेरिकन सरकारला आयातदारांना तब्बल १५० अब्ज डॉलर परत करावे लागतील. ‘जिओजित इन्व्हेस्टमेंट्स’चे रणनीतीकार डॉ. व्ही. के. विजयकुमार यांच्या मते, या निकालावरच बाजाराची पुढील चाल अवलंबून आहे. ३. भारतावर अतिरिक्त शुल्काची टांगती तलवार रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून ट्रम्प प्रशासनाने भारतावर अधिक कडक टॅरिफ लावण्याचे संकेत दिले आहेत. तसेच, रशियाकडून तेल घेणाऱ्या देशांवर ५०० टक्क्यांपर्यंत शुल्क आकारणाऱ्या नवीन प्रतिबंधक विधेयकामुळे बाजारपेठेत भीतीचे वातावरण आहे. ५०% टॅरिफमुळे भारत सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या देशांपैकी एक असल्याने गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत आहेत. ४. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या (Crude Oil) वाढत्या किमतींनी भारताची डोकेदुखी वाढवली आहे. ब्रेंट क्रूडचा भाव ०.५३ टक्क्यांनी वधारून ६२.३२ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. भारत आपल्या गरजेच्या मोठ्या प्रमाणावर तेल आयात करतो, त्यामुळे तेलाचे भाव वाढल्यास महागाई आणि चालू खात्यातील तूट वाढण्याची शक्यता असते, ज्याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला. ५. रुपयाची ऐतिहासिक घसरण डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची सातत्याने होत असलेली घसरण हे देखील बाजाराच्या घसरणीचे एक कारण आहे. शुक्रवारी रुपया ७ पैशांनी कमकुवत होऊन ८९.९७ च्या पातळीवर घसरला. परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेणे आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे रुपयावर दबाव कायम आहे.