नवी दिल्ली – देशांतर्गत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जीएसटी परिषदेने 22 सप्टेंबर रोजी 375 वस्तूंवरील जीएसटी दरात कपात केली होती. त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलन वाढले होते. मात्र नोव्हेंबरमधील जीएसटी संकलन फारसे वाढले नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. देशांतर्गत ग्राहकाची क्रयशक्ती जास्त नाही. ती फक्त उत्सवाच्या काळातच माफक खरेदीपुरती मर्यादित होती, हे यावरून स्पष्ट होत आहे. अप्रत्यक्ष कर विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यामध्ये जीएसटी संकलन केवळ 0.7 टक्क्यांनी वाढून 1.70 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये जीएसटी संकलन 1.69 लाख कोटी रुपये इतके होते, व्यापार युद्ध व इतर कारणामुळे निर्यात होत नसल्यामुळे देशांतर्गत विक्री वाढावी यासाठी जीएसटीत मोठी कपात करूनही प्रत्यक्षात देशातील विक्री मंदावली असल्याचे आकडेवारी जाहीर झाली आहे. अशा परिस्थितीत आता अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काय करावे लागेल या संदर्भात अर्थ मंत्रालयाला फेरविचार करावा लागण्याची शक्यता आहे. कारण मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स नोव्हेंबर महिन्यात पुन्हा खालावला आहे. याचा अर्थ जीएसटीतील कपात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पुरेशी ठरली नसल्याचे स्पष्ट होत आहे. या आकडेवारीचा लवकरच जाहीर होणार्या अर्थसंकल्पावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आयातीवरील कर संकलन वाढले – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारता विरोधात 50 टक्के आयात शुल्क लावल्यानंतर देशांतर्गत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जीएसटी कपात करण्यात आली असली तरी नोव्हेंबर महिन्यामध्ये देशांतर्गत जीएसटी संकलन 2.3 टक्क्यांनी कमी होऊन 1.24 लाख कोटी रुपये झाले आहे. याच काळामध्ये भारताची आयात वाढल्यामुळे आयातीवरील करातून झालेले संकलन मात्र 10.2 दोन टक्क्यांनी वाढून 45,976 कोटी रुपये इतके झाले आहे.