Sarkari Yojana : केंद्र सरकारने देशातील गर्भवती महिला आणि नवमातांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PM Matru Vandana Yojana – PMMVY) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेद्वारे, पहिल्यांदा गर्भवती होणाऱ्या महिलांना सरकारकडून ५,००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही मदत महिलांना त्यांच्या गर्भधारणेदरम्यान आणि बाळाच्या जन्मानंतर पोषण आणि आरोग्य सेवा घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी दिली जाते. नेमकी काय आहे ही योजना? पहिल्यांदा गरोदर असलेल्या महिलांना आणि स्तनपान करणाऱ्या मातांना आर्थिक सहाय्य करणे. पहिल्या प्रेग्नेंसीसाठी ५,००० रुपये तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केले जातात. एवढेच नव्हे, तर जर महिलेला दुसऱ्यांदा गर्भधारणा झाली आणि तिने मुलीला जन्म दिला, तर अशा वेळी सरकारकडून ६,००० रुपये इतकी मदत दिली जाते. या महिलांना मिळणार योजनेचा लाभ – या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय १९ वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST), दिव्यांग महिला, दारिद्र्यरेषेखालील (BPL) कार्डधारक, आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी, ई-श्रम कार्डधारक, शेतकरी सन्मान निधीचे लाभार्थी, मनरेगा जॉब कार्डधारक वर्गातील महिला अर्ज करू शकतात. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध – योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतो. बाळाच्या जन्माच्या २७० दिवसांच्या आत अर्ज करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन अर्ज कसा करावा? -सर्वात आधी अधिकृत वेबसाइट pmmvy.wcd.gov.in वर जा. -आपला मोबाईल नंबर टाकून ओटीपी (OTP) द्वारे नोंदणी करा. -मागितलेली सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरा. -लॉगिन करून संपूर्ण अर्ज फॉर्म भरा. -संबंधित आवश्यक कागदपत्रे जोडून अपलोड करा. ऑफलाईन अर्ज कसा करावा? तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्रात जाऊन फॉर्म जमा करून ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज करू शकता. केंद्र सरकारच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घेऊन महिलांनी आपले आणि आपल्या बाळाचे आरोग्य सुधारावे, यासाठी सरकारने हा मोठा हातभार लावला आहे.