Gold-Silver Prices: इराण आणि अमेरिकेची चर्चा फिसकटल्यानंतर शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळत आहेत. त्याचबरोबर सोने आणि चांदीतील बरीच गुंतवणूक डॉलरकेंद्री उत्पादनाकडे वळत आहे. त्यामुळे दिल्ली सराफात सोने आणि चांदीच्या दरात सोमवारी झट नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 300 रुपयांनी कमी होऊन 1 लाख 55 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 1 हजार 800 रुपयांनी म्हणजे एक टक्क्याने कमी होऊन 2लाख 45 हजार 200 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. एचडीएफसी सिक्युरिटी या संस्थेचे विश्लेषक सौमील गांधी यांनी सांगितले की गुंतवणूकदार आता सोने आणि चांदीपेक्षा अतिसुरक्षित समजल्या जाणार्या डॉलर आणि अमेरिकेच्या कर्जरोख्यामध्ये गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचा दर 25 डॉलरने कमी होऊन 4,722 डॉलर आणि चांदीचा दर दीड डॉलरने कमी होऊन 74 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता. आखातातील खनिज तेल पुरवठ्यावर प्रदीर्घकाळ परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जागतिक पातळीवर महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने आणि चांदीचे दर लघु पल्ल्यात तरी सध्याच्या उच्च पातळीवर राहण्याची शक्यता जास्त असल्याचे विश्लेषकांनी नमूद केले. हेही वाचा – Stock Market: क्रूड महागल्याने कोसळले शेअर निर्देशांक; अमेरिका होर्मुझ सामुद्रीधूनी रोखणार असल्याचा परिणाम