नवी दिल्ली – डिसेंबर महिन्यात भारताची निर्यात केवळ 1.87 टक्क्यांनी वाढून 38.5 अब्ज डॉलर झाली आहे. या महिन्यात भारताची आयात 8.7 टक्क्यांनी वाढून 63.55 अब्ज डॉलर झाली आहे. अशा परिस्थितीत डिसेंबर महिन्यातील व्यापारातील तूट 25 अब्ज डॉलरपर्यंत गेली आहे. अमेरिकेला होणारी निर्यात कमी झाल्यामुळे भारतीय व्यापारातील तूट वाढत चालली असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. नोव्हेंबर महिन्यातील परकीय व्यापारातील तूट 24 अब्ज डॉलर होती. तर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये परकीय व्यापारातील तूट केवळ 22 अब्ज डॉलर होती. याचा अर्थ मासिक पातळीवर आणि वार्षिक पातळीवर भारताची व्यापारातील तूट वाढली असल्याचे दिसून येते. वाणिज्य मंत्रालयाने उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत भारताची निर्यात केवळ 2.44 टक्क्यांनी वाढून 330 अब्ज डॉलर या पातळीवर गेली आहे. तर या कालावधीत भारताचे आयात 5.9 टक्क्यांनी वाढून 500.78 अब्ज डॉलर झाली आहे. त्यामुळे या कालावधीतील व्यापारी दूर 248 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. ही आकडेवारी जाहीर करताना वाणीज्य सचीव अग्रवाल यांनी सांगितले की, जागतिक व्यापारात प्रचंड अनिश्चितता निर्माण झाली आहे. मात्र तरीही अल्प स्वरूपात का होईना भारताची निर्यात डिसेंबर महिन्यात वाढली आहे. ही सकारात्मक बाब आहे. भारतीय निर्यातदारांना मदत करण्यासाठी वाणिज्य मंत्रालय आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे. निर्यातदार या योजनांचा फायदा घेत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत वार्षिक पातळीवर भारताची निर्यात यावर्षी 850 अब्ज डॉलरपेक्षा जास्त होईल. अमेरिका, चीन आणि सौदी अरेबियाला निर्यात वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.