पुणे – कॉसमॉस फाउंडेशन पुणे व कौशलम् न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून घेण्यात आलेल्या ’आदर्श व समर्थ भारताचे निकष काय असावेत?’ या निबंध स्पर्धेचा अंतिम निकाल व बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून वरिष्ठ शिक्षणतज्ञ व कॉर्पोरेट प्रशिक्षक डॉ. शरद जोशी आणि जेष्ठ अर्थतज्ञ व व्यवसाय नियोजक डॉ. अनिल धनेश्वर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉसमॉस फाउंडेशनचे अध्यक्ष अॅॅड. श्रीपाद पंचपोर तसेच कौशलम् न्यासाच्या मुख्य संरक्षक लीना मेहेंदळे, स्पर्धेचे परीक्षक तसेच कॉसमॉस फाउंडेशनचे विश्वस्त व इनसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. अशोक जोशी, फाउंडेशनचे विश्वस्थ सचिव डॉ. सुधाकर न्हाळदे, विश्वस्त ऍड. राधिका उर्सेकर, कॉसमॉस बँकेचे माजी चेअरमन शशिकांत बुगदे, त्यांच्या पत्नी हिमानी बुगदे, तसेच स्व. रामभाऊ म्हाळगी माध्यमिक विद्यालयाचे विद्यमान अध्यक्ष उपस्थित होते. स्पर्धेत प्रथम क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग या शाळेतील कु. समर्थ चौधरी याने तसेच द्वितीय क्रमांक परांजपे विद्यामंदिर शाळेतील कु. शाल्वि कुलकर्णी हिने तर तृतीय क्रमांक स्व. रामभाऊ म्हाळगी माध्यमिक विद्यालयातील कु. सायली मंचाळ हिने पटकावला. कॉसमॉस फाउंडेशन कडून प्रथम विजेत्यास रु. 15000/- द्वितीय विजेत्यास रु. 10000/- व तृतीय विजेत्यास रु. 5000/- त्याचबरोबर उत्तेजनार्थ म्हणून 10 स्पर्धकांना प्रत्येकी रु. 1000/- अशी भरघोस बक्षीसे प्रदान करण्यात आली. ज्या शाळेतील जास्तीत जास्त स्पर्धक भाग घेऊन उत्तम उत्तम निबंध लिहीतील अशा शाळेस कॉसमॉस फाउंडेशन च्या वतीने ’कॉसमॉस करंडक’ या नावाने खास बक्षीस ठेवण्यात आले होते. पहिल्या बक्षिसाचे मानकरी होण्याचा मान कात्रज, पुणे येथील स्व. रामभाऊ म्हाळगी माध्यमिक विद्यालय या शाळेला मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाउंडेशनच्या विश्वस्त अॅॅड. अनुराधा अंतापुरकर भारती यांनी केले तसेच फाउंडेशनचे विश्वस्त अमरनाथ चक्रदेव यांनी आभार प्रदर्शन केले.