नवी दिल्ली/न्यूयॉर्क: जगातील दिग्गज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) मंगळवारी संध्याकाळी अचानक डाऊन झाले. एलॉन मस्क यांच्या मालकीच्या या प्लॅटफॉर्ममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने भारत, अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडासह जगभरातील हजारो युजर्सना अडचणींचा सामना करावा लागला. सुमारे तासभर हे प्लॅटफॉर्म ठप्प असल्याने युजर्सनी इतर सोशल मीडिया माध्यमांवर आपली नाराजी व्यक्त केली. आऊटेजवर लक्ष ठेवणाऱ्या ‘Downdetector.com’ या वेबसाइटनुसार, अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे २२,९०० पेक्षा जास्त तक्रारींची नोंद झाली. याशिवाय ब्रिटन आणि कॅनडामध्येही २,७०० हून अधिक युजर्सनी ‘X’ वापरताना समस्या येत असल्याचे सांगितले. युजर्सना प्रामुख्याने टाइमलाइन रिफ्रेश न होणे, पोस्ट शेअर न करता येणे आणि लॉग-इनमध्ये अडचणी येत होत्या. भारतातही सेवा विस्कळीत – भारतात १३ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ७:४९ च्या सुमारास तक्रारींचा ओघ सुरू झाला. रात्री ८:३० वाजेपर्यंत भारतात २,००० हून अधिक युजर्सनी अधिकृतपणे प्लॅटफॉर्म डाऊन असल्याची तक्रार केली होती. ‘डाऊनडिटेक्टर’च्या अहवालानुसार, भारतामध्ये काही वेळातच या तक्रारींच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळाली. इतर प्लॅटफॉर्मवर तक्रारींचा पाऊस ‘X’ डाऊन होताच अनेक युजर्सनी फेसबुक, इंस्टाग्राम आणि थ्रेड्स सारख्या इतर प्लॅटफॉर्मवर धाव घेतली. तिथे त्यांनी #XDown आणि #TwitterDown असे हॅशटॅग वापरून आपली तक्रार नोंदवली. डाऊनडिटेक्टर ही संस्था विविध स्त्रोतांकडून स्टेटस रिपोर्ट गोळा करून तांत्रिक बिघाडांचा मागोवा घेते. मात्र, या तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण काय होते, याबाबत ‘X’ कडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.