Stock Market: मध्यपूर्वेत युद्ध भडकल्यानंतर संरक्षण क्षेत्रावर भारत भर देण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात सोमवारी 8% पर्यंत वाढ झाली होती. आगामी काळातही या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ होण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी या कंपनीच्या शेअर 14 टक्क्यांनी, पारस डिफेन्स कंपनीचा शेअर 13 टक्क्यांनी, भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा शेअर 4 टक्क्यांनी, एस्ट्रा मायक्रोवेव्ह प्रोडक्ट्स कंपनीच्या शेअरचा भाव 1.62 टक्क्यांनी, तनेजा एरोस्पेस कंपनीच्या शेअरचा भाव 1.34 टक्क्यांनी, हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीच्या शेअरचा भाव 1.75 टक्क्यांनी, भारत डायनामिक्स कंपनीच्या शेअरचा भाव 0.22 टक्क्यांनी वाढला. हेही वाचा – जमिनीवर सैन्य उतरवणार? ट्रम्पनी दिला धक्कादायक इशारा; इराणची नेव्ही, एअरफोर्स, लीडरशिप, सगळं संपलं! शेअर बाजाराच्या मुख्य निर्देशांकात सोमवारी दिड टक्क्याची घट झाली असली तरी संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात जास्त प्रमाणात वाढ झाली आहे. काही विश्लेषकांनी सांगितले की, ग्राहक वस्तू क्षेत्र वगळता इतर क्षेत्रावर आगामी काळात दबाव राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करू शकतात. विमान वाहतूक कंपन्या पिछाडीवर – संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ होत असतानाच युद्धामुळे विमान प्रवासावर परिणाम होणार असल्यामुळे नागरी विमान वाहतूक कंपन्यांच्या शेअरच्या भावात सोमवारी घट झाली. आगामी काळातही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. इंडीगो कंपनीच्या शेअरचा भाव सोमवारी सव्वा सहा टक्क्यांनी कोसळला. स्पाइस जेट कंपनीच्या शेअरचा भाव सहा टक्क्यांनी कोसळला. विमान कंपन्याबरोबरच तिकिटाची नोंदणी करणार्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावरही परिणाम होत आहे. यात्रा ऑनलाईन कंपनीच्या शेअरचा भाव साडेनऊ टक्क्यांनी, ट्रीप प्लॅनर्स कंपनीच्या शेअरचा भाव सात टक्क्यांनी, थॉमस कूक कंपनीच्या शेअरचा भाव 3.57 टक्क्यांनी कोसळला.