नवी दिल्ली – आतापर्यंत अमेरिकेची अॅलन मस्क यांच्या नेतृत्वाखालील टेस्ला कंपनी जगात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती आणि विक्रीत सर्वांच्या पुढे होती. मात्र शुक्रवारच्या आकडेवारीनुसार चीनमधील इलेक्ट्रिक वाहन निर्मात्या बीवायडी कंपनीने या क्षेत्रात टेस्ला कंपनीला पिछाडीवर टाकले आहे. गेल्या दोन वर्षापासून टेस्लाच्या विक्रीवर नकारात्मक परिणाम होत आहे. 2025 मध्ये या कंपनीची वाहन विक्री 9 टक्क्यांनी कमी झाली आहे. चौथ्या तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीअखेर कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सरलेल्या वर्षात कंपनीची विक्री कमी होऊन 1.64 दशलक्ष युनिट झाली आहे. तर याच कालावधीत बीवायडी कंपनीची विक्री 2.26 दशलक्ष युनिट झाली आहे. त्यामुळे या वर्षात बीवायडी टेस्लापेक्षा विक्रीच्या संख्येत कितीतरी पुढे गेली आहे. टेस्ला कंपनी फक्त इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करते तर बीवायडी कंपनी इलेक्ट्रिक वाहनासह इतर इंधनांच्या वाहनांची निर्मिती करते. मात्र गेल्या काही वर्षापासून इलेक्ट्रिक वाहनावर जास्त भर दिला आहे. बीवायडी कंपनीची 2025 मध्ये इलेक्ट्रिक वाहन विक्री 28 टक्क्यांनी वाढली आहे. ही कंपनी चीनसह इतर देशांना मोठ्या प्रमाणात निर्यात करीत आहे. त्यातल्या त्यात युरोपामध्ये बीवायडी कंपनीच्या वाहनाची विक्री अधिक वेगाने वाढत असल्याचे समजले जाते. चीनकडे इलेक्ट्रिक वाहनासाठीचे सर्व तंत्रज्ञान आणि कच्चा माल मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे चीनमधील कंपन्यांना इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करण्यासाठी कसलेही अडथळे येत नाहीत. या उलट चीन रेअर अर्थ मेटलसारख्या धातूंचा जागतिक पुरवठा रोखून धरत आहे. त्यामुळे इतर देशातील वाहन उत्पादनावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून आले. बीवायडी कंपनी करणार दरवाढ दरम्यान चीनमधील इलेक्ट्रिक वाहन कंपनी बीवायडी भारतात आपल्या वाहनांचे दर 50 हजार रुपयापर्यंत वाढविणार असल्याचे या कंपनीने सांगितले आहे. या दरवाढीच्या अंमलबजावणी एक जानेवारीपासून सुरू झाली असून आता येथून पुढे होणार्या बुकिंगच्या किमती वाढविण्यात येणार असल्याचे कंपनीने नमूद केले. कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले की, रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे आयात महागात पडत आहे. अशा परिस्थितीत दरवाढ करणे अपरिहार्य झाले आहे. तसेच आमच्या वाहनांना भारतीय ग्राहक पसंद करीत असल्याचा दावा या कंपनीने केला आहे.