प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकी प्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत युती-आघाडीमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. शेवटच्या क्षणापर्यंत कोण कुणासोबत व कोण कुणाच्या विरोधात लढत आहेत, हे स्पष्ट होऊ शकले नाही. यामुळे कार्यकर्तेच नव्हे तर इच्छुक उमेदवारही संभ्रमात होते. महापालिका निवडणुकीत दिसलेला युती आणि आघाडीचा एकत्र लढण्याचा तिढा या निवडणुकीत ही दिसला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये युती व आघाडीबाबत शेवटपर्यंत अनिश्चिततेचे वातावरण कायम होते. विशेषतः भाजपने महापालिका निवडणुकीप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही शिवसेनेला शेवटपर्यंत झुलवत ठेवल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणूकीत दोन चिन्ह असल्याने मतदारांचा गोंधळ उडाला तो टाळण्यासाठी जास्तीत जास्त जागेवर घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविण्यात येत असल्याचे दोन्ही पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे. एबी फॉर्म अखेर सादर… उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बुधवारी दुपारी तीनपर्यंत अंतिम मुदत होती. अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले. मात्र अर्जासोबत पक्षाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज भरल्याचा एबी फॉर्म जोडला नाही. त्यामुळे विविध पक्षातील उमेदवारांनी थेट निवडणुक कार्यालयाच्या परिसरात सकाळपासून ठाण मांडले होते. दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास पक्षातील पदाधिकारी यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एबी फॉर्म सादर केले. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत अधिकृत उमेदवारी कोणाला मिळाली, याची माहिती अनेक उमेदवारांना नव्हती.