प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) एकत्र लढण्याची दाट शक्यता असून, आज दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या निकषांवर महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र, या सर्व प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) सोबत न घेण्याचा सूर उमटला. पुणे जिल्हा परिषदेतही भाजप-शिवसेना एकत्र निवडणुका लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.पुण्यातील या महत्त्वाच्या बैठकीला केंद्रीय मंत्री तथा भाजपचे जिल्हा निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार विजय शिवतारे, भाजपचे नेते राजेश पांडे आणि आमदार राहुल कुल उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या एकूण जागांपैकी कोणत्या जागा कोणाकडे राहतील आणि उमेदवारीचे निकष काय असावेत, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. दोन्ही पक्षांनी आपापल्या ताकदीचा आढावा घेत प्राथमिक आराखडा तयार केल्याचे दिसून येत आहे.भाजपच्या जिल्हा कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत (अजित पवार निवडणूक लढवण्यास स्पष्ट विरोध दर्शवल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीसोबत असलेले संघर्ष आणि कार्यकर्त्यांची नाराजी लक्षात घेता केवळ शिवसेनेसोबत युती करून पुढे जावे, असा सूर या बैठकीत उमटला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या बैठकीतही भाजप व शिवसेना एकत्रपणे जिल्हा परिषद निवडणुका लढविणार असल्याची शक्यता आहे. आढावा बैठक, युतीची चर्चा : राजेश पांडे पुणे ग्रामीणमधील पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला आणि चर्चा झाली. दुसऱ्या दिवशीही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात महायुती करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार असून, वर्षानुवर्षे सत्ता असलेल्या लोकांकडून काहीच कामे झाली नाही, ते जनतेपर्यंत पोहाचविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी दिली.