प्रभात वृत्तसेवा पुणे – भारतीय जनता पक्षाने मागील महापालिका निवडणुकीत जिंकलेल्या जागा वगळून केवळ विरोधकांच्या ताब्यात असलेल्या जागांवरच युतीअंतर्गत वाटाघाटी करण्याचे प्राथमिक सूत्र ठरले आहे. त्यामुळे भाजपच्या १०५ जागा वगळता उर्वरित जागांवरच भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात चर्चा होणार आहे. गुरुवारी झालेल्या भाजप आणि शिवसेना यांच्यातील प्राथमिक बैठकीत याबाबत चर्चा झाली. मात्र, या सुत्राचा फटका शिवसेनेलाच बसण्याची शक्यता असून शिवसेनेला केवळ २० ते २२ जागा मिळतील, असे सांगण्यात येत आहे. तर, भाजपकडून शिवसेनेला आपला प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले आहेया बैठकीला भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे आणि शिवसेनेकडून उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार विजय शिवतारे, शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे उपस्थित होते.बैठकीबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडे सध्या १०५ माजी नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत गमावलेल्या जागांवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी अन्य पक्षांतील काही प्रमुख नेत्यांचे पक्षप्रवेश येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने जिंकलेल्या जागांवर भाजपकडून पर्याय निर्माण करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात अन्य पक्षांतील नेते भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत मागील निवडणुकीत भाजपने जिंकलेल्या जागांवर चर्चा होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. तसेच उर्वरीत जागांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर जो पक्ष असेल त्याला प्राधान्य देण्याबाबतही सूत्र निश्चित करण्यात आले आहे. शिवसेनेकडे सध्या तीन माजी नगरसेवक आहेत तर पक्षाच्या पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या दोन्ही सूत्रानुसार शिवसेनेला अपेक्षीत जागा मिळणे अवघड असल्याची चर्चा आहे. “युतीच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली आहे. काही नावे आणि प्रभागांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. एक-दोन बैठकीनंतर जागांवर एकमत होईल. एकमत झाल्यानंतर युतीची अधिकृत घोषणा करण्यात येईल.” – मुरलीधर मोहोळ, खासदार, पुणे “प्राथमिक बाबींवर चर्चा झाली आहे. मागील निवडणुकीत ज्या ५० जागांवर विरोधक निवडून आले होते, त्या जागांवर वाटाघाटी करण्यात येतील. निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला दोन्ही पक्षांच्या सहमतीने उमेदवारी देण्यात येईल.” – विजय शिवतारे, आमदार, शिवसेना महानगरप्रमुख धंगेकर बैठकीपासून दूर… महापालिकेसाठी युतीच्या चर्चेमधून महानगर प्रमुख रविंद्र धंगेकर यांना दूर ठेवण्यात आले. भाजप नेत्यांवर केलेल्या टीकेमुळे त्यांना बैठकीस आमंत्रित करण्यात आले नसल्याची चर्चा आहे. याबाबत धंगेकर म्हणाले की, शिवसेना आणि भाजप नेत्यांची बैठक होणार असल्याचे दुपारनंतर समजले. मात्र, त्या बैठकीचे निमंत्रण मला मिळाले नाही. निरोप आल्यास मी बैठकीस उपस्थित राहीन. भाजपची माझ्याविषयी नाराजी वाढते की कमी होते, ते पाहावे लागेल, तसेच जागांबाबतचे माझे मत मी एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडणार असल्याचेही धंगेकर यांनी सांगितले.