पुणे : प्रभागातील प्रत्येक झोपडपट्टीधारकाला एसआरए आणि म्हाडाच्या माध्यमातून हक्काचे, कायदेशीर आणि पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भाजपच्या प्रभाग क्रंमाक २२ (क) च्या अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांनी दिली. अर्चना पाटील यांनी प्रचाराच्या दरम्यान मतदारांशी संवाद साधताना प्रभागाच्या विकासाचा एक ठोस आणि महत्त्वाकांक्षी आराखडा जनतेसमोर मांडला. त्यामध्ये कष्टकऱ्यांना हक्काचे घर मिळवून देण्यास प्राधान्यक्रम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाटील म्हणाल्या, की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०३० पर्यंत भारत आणि महाराष्ट्र झोपडपट्टी मुक्त करण्याचे जे स्वप्न पाहिले आहे, त्याला अनुसरूनच काशेवाडी आणि लोहियानगर परिसराचा संपूर्ण कायापालट करण्याचा आपला मानस आहे. प्रभागातील प्रत्येक झोपडपट्टीधारकाला एसआरए आणि म्हाडातून हक्काचे, कायदेशीर आणि पक्के घर उपलब्ध करून देणार आहे. सादिक लुकडेंचा भाजपमध्ये प्रवेश या प्रभागातील काँग्रेसचे कार्यकर्ते सादीक लुकडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे भाजपच्या उमेदवारांची ताकद वाढली आहे. मुस्लिम सहकारी बँकेवर तज्ज्ञ संचालक म्हणून काम करत असणारा पुणे शहरातील मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील उच्चशिक्षित इंजिनियर तरुण म्हणून त्यांची ओळख आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह माजी मंत्री दिलीप कांबळे व सुनील कांबळे या वेळी उपस्थित होते.