प्रभात वृत्तसेवा पुणे – राष्ट्रवादी काॅंंग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या राजीनामा नाट्यानंतर पुण्याच्या शहराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालायची असा प्रश्न सध्या पक्षापुढे आहे.दोन दिवसांच्या घडामोडींनंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर बुधवारी जगताप यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. एवढेच नव्हे तर त्यांनी पक्षही सोडून दिला. त्यामुळे आता शहराध्यक्ष कोण ? असा प्रश्न पक्षासमोर उभा ठाकला आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते विशाल तांबे यांनी आपण निवडणूक लढवणार नाही, असे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे पक्षाकडून त्यांना शहराध्यपदाची जबाबदारी देण्यात येईल, अशी चर्चा आहे. तर, पक्षाने मला प्रचारासंबंधी किंवा कार्यालयीन जबाबदारी दिल्यास ती मी पार पाडेन, असे तांबे यांनीही पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांना कळविले आहे. जगताप यांनी राजीनामा दिल्यानंतर ते पद रिक्त झाल्याने ही जबाबदारी तांबे यांच्यावर सोपवावी का, याबाबत पक्षात सध्या चर्चा सुरू आहे.निवडणुकीला जेमतेम १९ दिवस राहिले आहेत. या १९ दिवसांमध्ये निवडणुकीची जबाबदारी, रणनिती, सभा, मेळावे सगळ्याच गोष्टींची व्यूहरचना करावी लागणार आहे. त्यामुळे पक्षाचे ज्येष्ठ सदस्य आणि प्रवक्ते अंकुश काकडे यांनी प्रभारी शहराध्यक्षपद स्विकारावे, अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. मात्र, त्यांनी त्यास नकार दिला आहे. “महापालिका निवडणूक लढवणार नाही हे आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे पक्षाने आपल्याला अंतर्गत कोणतीही जबाबदारी द्यावी आपण ती पार पाडू, असे आपण पक्षाला आधीच सांगितले आहे. त्यामुळे पक्ष आताही जी जबाबदारी देईल ती पार पाडेन. आता, १९ दिवसच राहिले आहेत. त्यामुळे एकूणच घडामोडी पाहता, पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागणार आहे.” – विशाल तांबे, माजी नगरसेवक