प्रभात वृत्तसेवा पुणे – गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांसाठी पुणेकरांनी आपला कौल आज (शुक्रवार) मतपेटीत बंद केला आहे. शहरात सुमारे ५२ टक्के मतदान झाले असून, सुमारे १८ लाख १२ हजार पुणेकरांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. २०१७ मध्ये ५५ टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदा २०१७ च्या तुलनेत मतदारांची संख्या तब्बल ९ लाखांनी अधिक आहे. शहरातील ४०११ केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया तुरळक घटना वगळता शांततेत पार पडली.दरम्यान, सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर काही केंद्रांवर मशिनमध्ये बिघाड झाल्याने, उमेदवार, तसेच मतदारांनी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले त्यानंतर सुमारे २० कंट्रोल युनिट, तर ५२ बॅलेट युनिट बदलल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. या निवडणुकीसाठी सुमारे ३५ लाख ५२ हजार ६३७ मतदार होते. त्यातील सुमारे १८ लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीसाठी तब्बल ११५३ उमेदवार आपले नशीब आजमावत असून, पुणेकरांचा कौल नेमका कोणाला, हे उद्या ( गुरुवारी) स्पष्ट होणार आहे. शहरात प्रभाग क्रमांक ९ बाणेर-बालेवाडी मध्ये सर्वाधिक ७६ हजार मतदान झाले आहे, तर सर्वात कमी मतदान प्रभाग ३९ अप्पर- सुप्पर इंदिरानगर परिसरात झाले आहे. या निवडणुकीसाठी शहरात ९०६ संवेदनशील मतदान केंद्र घोषित करण्यात आली होती. सकाळी शुकशुकाट, संध्याकाळी रांगा… गेल्या काही निवडणुकांपासून शहरात सुरू असलेला मतदानाचा कल या निवडणुकीतही कायम होता. सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू झाल्यानंतर विधानसभा लोकसभा निवडणुकीत मतदार सकाळीच बाहेर पडत असल्याचे दिसून आले. मात्र, महापालिका निवडणुकीत सकाळी साडेसात ते साडेनऊपर्यंत अवघे ६ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर साडेनऊपासून मतदान केंद्रांवर गर्दी वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता हा आकडा ९ टक्क्यावरून १५ टक्के झाला. त्यानंतर दुपारी दीड वाजता ११ टक्के वाढून २६.२८ टक्के मतदान झाले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत त्यात १० टक्के वाढ होऊन ३७ टक्के मतदान झाले होते. मात्र, शेवटच्या दोन तासांत तब्बल १५ टक्के वाढ झाल्याने हा आकडा ५२ टक्क्यांपर्यंत वाढला असून, एकूण २० लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. पैशांचा महापूर मतदान केंद्राच्या बाहेर थेट पैसे वाटप सुरू असल्याने राजकीय पक्षांच्या बुथवर उभे राहण्यास जागा नसल्याची स्थिती शहरातील वस्ती भाग असलेल्या काशेवाडी, डायसप्लाॅट, जनता वसाहत, वडारवाडी, पाटील इस्टेट, रास्ता पेठ, दत्तवाडी, तळजाई वसाहत परिसरात दिसून आली. अनेक पक्षांचे राजकीय कार्यकर्ते मतदारांना रिक्षातून, तसेच स्वत:च्या वाहनात घेऊन येत असल्याचे दिसून आले. याशिवाय काही ठिकाणी मतदारांना थेट भेटवस्तू दिल्याचेही चित्र होते. त्यामुळे या भागात मतदानाच्या शेवटच्या दोन तासांत केंद्रांच्या बाहेर रांगा लागल्याने पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला. या सर्व ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याचे पाहायला मिळाले. दृष्टिक्षेपात मतदानाची स्थिती – एकूण उमेदवार : ११५३ – एकूण मतदार : ३५ लाख ५२ हजार ६३७ – झालेले मतदान : १८ लाख – शहरात सुमारे ५२ टक्के मतदान – सर्वाधिक मतदान : प्रभाग ९ ( सूस-बाणेर-पाषाण) : ८२ हजार -सर्वात कमी मतदान ; प्रभाग ३९ (अप्पर-सुप्पर इंदिरानगर) : २२ हजार ६३८ – मशिनमध्ये बिघाड – ४७ ठिकाणी – बदलण्यात आलेल्या मशिन : ७२