Weapon License Scam – लोणावळ्यातील एका धक्कादायक प्रकारातून सराईत गुन्हेगाराला मिळालेल्या शस्त्र परवान्याचा घोटाळा उघड झाला आहे. पिस्तूल दाखवून तरुणीला धमकावल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात खोटा पत्ता, बनावट भाडेकरार आणि चुकीचे शपथपत्र देऊन शस्त्र परवाना मिळवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सीसीटीव्हीतील धक्कादायक दृश्य लोणावळा येथे मॅफको गार्डनसमोर उभ्या असलेल्या बीएमडब्यू कारमधून उतरलेल्या व्यक्तीने एका तरुणीवर पिस्तूल रोखून धमकावल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. तपासादरम्यान संबंधित तरुण आणि तरुणी दोघेही एका फार्म हाउसवर आढळून आले. तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, भूषण ऊर्फ राहुल रामचंद्र तारू हा तिचा परिचित असून, दोघांत वादावादी झाल्यानंतर त्याने मारहाण करून तिच्यावर पिस्तूल रोखून धमकी दिल्याचे तिने सांगितले. सराईत पार्श्वभूमी, तरीही परवाना या घटनेनंतर पोलिसांनी भूषणची सखोल माहिती घेतली असता, तो सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. मग त्याला शस्त्र परवाना मिळाला कसा, याचा तपास सुरू झाला. पोलिस तपासानुसार, भूषण ऊर्फ राहुल याने ४ नोव्हेंबर २०२२ रोजी पुणे पोलीस आयुक्तालयाकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता. त्याने लोणी काळभोर येथील स्वप्नशील सोसायटीमध्ये वास्तव्यास असल्याचे दाखवणारा खोटा भाडेकरार, शपथपत्र व कागदपत्रे जोडली. प्रत्यक्षात तो कधीही त्या पत्त्यावर राहात नसल्याचे स्पष्ट झाले. आरोपीविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात २०००, २००६, २०११ मध्ये गुन्हे दाखल आहेत, तसेच बंडगार्डन पोलीस ठाण्यातील गुन्हे नोंद असूनही अर्ज करताना त्याने ही माहिती लपवली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८१, ४२०, ४६५, ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, तसेच पिस्तूल दाखवून धमकावल्याच्या घटनेबाबतही लोणावळ्यात स्वतंत्र गुन्हा दाखल आहे. “शस्त्र परवानाप्रकरणी आम्ही पुणे पोलीस आयुक्तालयाला पत्र पाठवले आहे. त्याप्रमाणे ते पुढील कार्यवाही करतील.” – संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण