पुणे : बोपोडी परिसरात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊ, या भागात महापालिकेचे दोन दवाखाने आहेत. त्यांना दर्जेदार करण्याबरोबरच ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन भाजप आणि आरपीआय युतीचे उमेदवार सनी निम्हण यांनी केले. भाजप, रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ती गायकवाड, सपना छाजेड यांची पदयात्रा बोपोडी परिसरात काढण्यात आली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित नागरिकांनी महापालिकेची आरोग्य सेवा आणखी सक्षम करण्याची मागणी उमेदवारांकडे केली. यावेळी सनी निम्हण यांनी महापालिकेच्या माध्यमातून त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदारांशी संवाद साधताना चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण म्हणाले, बोपोडी परिसराचा सर्वांगीण व समतोल विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बोपोडीतील नागरिकांना पिंपरीतील वाय.सी.एम. हॉस्पिटल, खडकीतील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल किंवा पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावे लागते आणि या भागात असलेला शेवाळे दवाखाना सध्या कार्यरत असला तरी त्यामध्ये सोईसुविधांचा अभाव असून, तिथे फक्त ओपीडी आहे. खेडेकर दवाखान्यात अत्याधुनिक सोईसुविधांसह ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येईल, तर संजय गांधी दवाखाना जो सध्या बांधून तयार आहे परंतु सुरू झालेला नाही तो लवकरात लवकर पूर्ण क्षमतेनेसुरू करू, असेही त्यांनी सांगितले.