पुणे : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रितम नागपूरे, गौरव घुले, अस्मिता शिंदे आणि रश्मी आमराळे यांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. गेल्या दोन दिवसांत अप्पर ओट्टा आणि बिबवेवाडी परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून जनसंपर्क दौरा राबवण्यात आला. रविवारी (४ जानेवारी) आणि सोमवारी (५ जानेवारी) सायंकाळी २७६ अप्पर ओट्टा परिसरात प्रचाराचा धडाका पाहायला मिळाला. यावेळी बोलताना, “इथला माणूस हाच आमची खरी ताकद आहे,” अशा शब्दांत उमेदवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सोमवारी सकाळी बिबवेवाडीतील प्रमुख सोसायट्यांमध्ये झालेल्या प्रचार फेरीदरम्यान तुळशीनगर सोसायटी, गणेश विहार, गजरा सोसायटी, वैभव सोसायटी, रिद्धी-सिद्धी सोसायटी, जयश्री सोसायटी आणि योगायोग सोसायटी येथील रहिवाशांची भेट घेण्यात आली. या वेळी सोसायट्यांमधील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन या विषयांवर सुशिक्षित मतदार व ज्येष्ठ नागरिकांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रचारादरम्यान बोलताना प्रभाग क्रमांक २०-डचे उमेदवार गौरव घुले यांनी सांगितले की, “बिबवेवाडीचा कायापालट करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. प्रत्येक सोसायटी आणि वस्तीचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे.” महिला उमेदवारांनीही यावेळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. या प्रचार दौऱ्यात उमेदवारांसोबत मंगेश कदम, सुयोग बसवंत, दत्ता कांबळे, बाबा महाडिक, ताई लकडे, ओमकार कांटे, साहिल जोशी, धनंजय निंबाळकर, मृणालिनी वाणी, पूजा उजागरे, वैशाली खोपटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.