प्रभात वृत्तसेवा पुणे – वसंतदादा सहकारी साखर संस्थेची वार्षिक सभा सोमवारी (दि. २९) होत असून यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण होणार आहे. पुरस्कारांचे वितरण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून विविध गटातील ४२ पुरस्कार यावेळी दिले जातील, अशी माहिती व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडूपाटील यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी व्हीएसआयचे अऩेक पदाधिकारी उपस्थित होते. यावर्षीचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार बारामतीच्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. कै. विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार सांगलीच्या डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. कै. विक्रमसिंह घोटगे सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार लातूरच्या विलास सहकारी साखर कारखान्याला, तर रावसाहेब पवार सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार सांगलीच्या राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. अन्य पुरस्कार विजेत्यांमध्ये किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार – श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, कर्मयोगी शंकररावजी पाटील आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार- नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज, आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील ऊस विकास व संवर्धन पुरस्कार- अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना. या शिवाय चांगल्या ऊस उत्पादनासाठी ९ शेतकऱ्यांना पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. यावर्षीचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार सोलापूरच्या नितीन भाऊराव काळे, वसंतराव नाईक पुरस्कार सांगलीच्या अनिल सदाशिव लाड, तर अण्णासाहेब शिंदे पुरस्कार सांगलीच्याच प्रदीप बाबासो नांगरे यांना घोषित करण्यात आला आहे. यावेळी वैयक्तिक कामगिरीसाठी साखर काऱखान्यातील ८ कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे, तांत्रिक कार्यक्षमतेसाठी ९ साखर कारखान्यांना, तर ऊस विकास आणि संवर्धनासाठी पाच साखर कारखान्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.