प्रभात वृत्तसेवा पुणे – युतीतील जागावाटपाचा अध्याय संपला आहे. महापालिका निवडणुकीच्या इतिहासात शिवसेना पहिल्यांदाच ११९ जागांवर निवडणूक लढवत आहे. येत्या १६ जानेवारीला दखल घेण्याएवढे शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतील आणि पुण्याचा महापौर ठरविताना आम्हाला विश्वासात घ्यावे लागेल असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. आज पुण्यात सर्वत्र शिवसेनेचे भगवे वातावरण असून, शिवसेनेने सत्तेच्या माध्यमातून केलेला विकास पुणेकरांपर्यंत आम्ही घेऊन जाणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ शनिवारी ग्रामदैवत कसबा गणपती, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर येथे आरती करून आणि जैन मंदिर येथे दर्शन घेऊन झाला. त्यानंतरच्या मेळाव्यास शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार विजय शिवतारे, शहराध्यक्ष नाना भानगिरे, माजी आमदार रविंद्र धंगेकर, अजय भोसले, आबा बागुल, युवा नेते किरण साळी, रमेश कोंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या प्रश्नांची सोडवणूक केल्याने पुणेकरांचा आम्हाला पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त करत सामंत म्हणाले, शिवशक्ती, श्रमशक्ती विरोधात धनशक्ती अशी ही लढाई आहे. संघर्ष सेनेच्या पाचवीला पुजलेला असून, त्यातूनच मोठे काम उभे राहते हा इतिहास आहे. उमेदवारांनी घरोघरी प्रचार करावा, त्यांना ठामपणे सांगा तुमच्या अडचणी शिवसेना सोडवणार आहे. शिवसेनेची खरी ताकद उमेदवारांनी दाखवून दिली पाहिजे. आमच्याकडे एक नगरसेवक असला तरी त्याचे १५० नगरसेवक कसे करावयाचे हे एकनाथ शिंदे यांना माहिती आहे. महापालिका आता शिवसेनेच्या ताब्यात आली पाहिजे. डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेवर विरोधकांचा अपप्रचार जनतेने फेटाळला आहे. निवडणुकीत जनता पुन्हा शिवसेनेला साथ देईल.शिंदे यांची पूर्ण ताकद उमेदवारांच्या पाठीशी आहे. महिलांना पीएमपीत अर्धे तिकीट, प्रत्येक प्रभागात आपला दवाखाना, नवीन धरणे, अपघात-कोंडीमुक्त पुणे, मंदिरांचे संरक्षण ही कामे प्राधान्याने करण्यात येतील.