पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महत्त्वाचे कागदपत्र आणि रेकॉर्ड सामान्य नागरिकांसाठी खुली करावीत, अशी मागणी ‘सजग नागरिक मंच’ने केली आहे. राज्याच्या सरकारने २०१८ मध्ये काढलेल्या एका नियमाची अंमलबजावणी विद्यापीठात होत नसल्याचा आरोप मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. सुरेश गोसावी आणि प्रभारी कुलसचिव डाॅ. ज्योती भाकरे यांना यासंदर्भात निवेदन त्यांनी दिले आहे. कामकाजात जास्त पारदर्शकता यावी आणि नागरिकांना माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज करण्याची संख्या कमी व्हावी, यासाठी सरकारने हा नियम आणला आहे. त्या उद्देशाने राज्य शासनाने हे परिपत्रक काढले होते. त्यानुसार दर सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत विद्यापीठातील सर्व विभागांमधील कागदपत्रे व रेकॉर्ड नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पुणे महापालिका अनेक वर्षांपासून ही प्रक्रिया राबवत असून, त्याबाबतचे फलकही महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये लावण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेनेही या परिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करावी. यासोबतच, नागरिकांना माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी विद्यापीठातील सर्व विभागांमध्ये संबंधित वेळा व प्रक्रियेचे स्पष्ट फलक लावावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, विद्यापीठ प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.