प्रभात वृत्तसेवा पुणे – कोथरूड हा भाजपाचा बालेकिल्ला. त्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी अशी त्रिशक्ती असलेला कोथरूड मतदारसंघाकडे संपूर्ण पुण्यासह राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, मतदारांनी भाजपला कौल देत यंदाही कोथरुडमध्ये भाजपने विजयाची परंपरा कायम राखत प्रभाग १० आणि ३१ मध्ये भाजपच्या चारही उमेदवारांनी विजयाची गुढी उभारली. तर प्रभाग ११ मध्ये भाजपला एकाच जागेवर विजयी मिळविता आला. याठिकाणी काॅग्रेसने दोन आणि राष्ट्रवादी काॅग्रेसने एक जागा जिंकत विजयाची परंपरा सुरू ठेवली. त्यामध्ये १२ जागांपैकी ९ जागांवर भाजपने मताधिक्य घेत विजय मिळवला. तर दोन जागांवर काॅग्रेसने आणि एका जागेवर राष्ट्रवादीने विजय मिळवला. प्रभाग १० बावधन-भुसारी काॅलनी भाजप आणि राष्ट्रवादी काॅग्रेस या दोघांमध्ये चुरशीची लढत पहायला मिळाली. मात्र, मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना कौल दिल्यामुळे भाजपचे चारही उमेदवारी सर्वाधिक माताधिक्याने विजयी झाले. त्यामध्ये किरण दगडे पाटील यांना सर्वाधिक २९ हजार २११, रूपाली पवार यांना २३ हजार ६४९, अल्पना वरपे यांना २८ हजार २१६ तर दिलीप वेडेपाटील यांना २४ हजार ७२४ इतके मते मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला. प्रभाग ११ रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर हा काॅग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, मात्र २०१७ च्या निवडणुकीत भाजपने एका जागेवर विजयी मिळवत खाते उघडले. या वर्षीही भाजपला एकाच जागेवर समाधान मानावे लागले असून, डाॅ. संदीप बुटाला यांच्या पत्नी मनीषा बुटाला १२ हजार ७८९ मते मिळवून विजयी झाले. तर काॅंग्रेसचे रामचंद्र कदम यांनी सर्वाधिक २३ हजार ७१२ आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे हर्षवर्धन दीपक मानकर यांनीही सर्वाधिक १९ हजार ११६ मते घेऊन विजयाची परंपरा सुरू ठेवली. यावेळी काॅंग्रेसकडून दीपाली संतोष ढोक १२ हजार ५३५ मते घेऊन विजयी झाल्या. प्रभाग ३१ मयूर कॉलनी-कोथरूड मध्ये २०१७ मध्ये तीन भाजप आणि एक शिवसेना अशी परिस्थिती या प्रभागाची होती. मात्र, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि या प्रभागामध्ये सुतार यांच्यासह वासंती जाधव, ज्योत्स्ना कुलकर्णी आणि दिनेश माथवड या भाजपच्या चारही उमेदवारांनी बाजी मारत बालेकिल्यावर वर्चस्व राखले. त्यामुळे शिवसेना आणि मनसेचा धक्का बसला. फेर मतमोजणीची मागणी प्रभाग ११ क मधील काँग्रेसच्या उमेदवार नयना सोनार यांनी मतमोजणीवर आक्षेप घेत फेरमोजणीची मागणी केली. प्रशासनाने मागणी ऐकून काही मतदान यंत्राची परत मोजणी केली. त्यानंतर वातावरण निवळले आणि भाजपच्या मनीषा बुटाला यांना १ हजार २७४ मतांनी विजयी घोषित केले. तर प्रभाग क्रमांक ३१ मध्ये मशीन बदलल्या, एकच शील आहे, नंबरमध्ये तफावत अशा तक्रारी मांडत राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेनेकडून मतमोजणीवर बहिष्कार टाकला.