प्रभात वृत्तसेवा पुणे – गेल्या आठवडाभरात पुणे शहरातील तापमानात मोठे चढ- उतार जाणवत असून, दुपारची वाढलेली उष्णता आणि रात्रीची कडक थंडी, यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हवामान विभागाच्या नोंदींनुसार दुपारचे कमाल तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत जात असताना रात्री आणि पहाटे किमान तापमान ८ ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरत आहे. दुपारी कडक ऊन आणि उष्णतेमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून, रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत बाजारपेठा ओस पडत असून, संध्याकाळनंतरच गर्दी वाढते. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे रात्री आणि पहाटे वातावरणात गारवा वाढत असून, अनेक भागांत थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. अचानक बदलणाऱ्या तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप आणि घसा खवखवण्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना याचा अधिक फटका बसत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, निरभ्र आकाशामुळे दिवसा सूर्यप्रकाशाने तापमान वाढते, तर रात्री जमिनीतील उष्णता वेगाने निघून गेल्याने थंडी वाढते. हा हिवाळी हंगामातील नेहमीचा मात्र तीव्र स्वरूपाचा तापमान फरक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे आणि आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन व डॉक्टरांकडून करण्यात आले आहे. कमाल तापमान लवळे ३०.९, कोरेगाव पार्क ३०.३, हडपसर २८.६, शिवाजीनगर २८.६, वडगावशेरी २८.५, चिंचवड, २८.४, बारामती २८.४, माळीण २८.३, पाषाण २७.१, लोहगाव ३०.४ अंश सेल्सियस. किमान तापमान पाषाण ८, शिवाजीनगर ८.६, माळीण ८.९, कोरेगाव पार्क १३, हडपसर ११.१, बारामती ९.३, चिंचवड १४.४, लवळे १५.८, पाषाण १०.६, लोहगाव ८ अंश सेल्सियस.