प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्यातील किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाल्यामुळे मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील थंडीची लाट ओसरत आहे. तर अहिल्यानगर, पुणे, नाशिक, मालेगाव आणि विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान ९ अंशापर्यंत खाली नोंदविल्यामुळे गारठा चांगलाच जाणवत आहे. तर अन्य जिल्ह्यातील थंडीचा पारा १० ते ११ अंशाच्या पुढे गेला आहे.राज्यातील मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात किमान तापमान ६ अंशाच्या खाली नोंदविल्यामुळे थंडीची लाट आली आणि हुडहुडीने महाराष्ट्र गारठला होता. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून किमान तापमान दोन ते तीन अंशाने वाढ झाल्यामुळे पारा ९ अंशावर आला, तर काही जिल्ह्यांतील पारा ११ ते १२ अंशाच्या पुढे गेल्यामुळे थंडीचा जोर ओसरू लागला आहे. मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, नाशिक, मालेगाव, तर विदर्भातील गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यातील किमान तापमान ९ अंशापर्यंत नोंदविले. परिणामी या जिल्ह्यात हुडहुडी कायम असून, अन्य जिल्ह्यात मात्र हुडहुडी कमी झाल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यातील किमान तापमानात फारसा बदल होणार नसून, थंडीचा जोर कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आला.