प्रभात वृत्तसेवा पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाने प्रभाग १६ हडपसर – सातववाडी आणि प्रभाग २७ नवीपेठ – पर्वती येथील बंडखोर उमेदवारांवर पक्षाने शिस्तभंगाची कारवाई केली आहे. तसे पत्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जाहीर केले आहे.प्रभाग १६ मधून भाग्यश्री जाधव आणि अविनाश काळे यांना उमेदवारी दिली होती; परंतु दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक होऊन येथे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने समन्वयाने वैशाली बनकर (अ), वर्षा पवार (ब), कमलेश कापरे (क) आणि योगेश ससाणे (ड) यांना उमेदवारी दिली आहे. हे चौघे घड्याळाच्या चिन्हावर येथे निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शप) ने जाधव आणि काळे यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले. मात्र, त्यांनी पक्षाचे ऐकले नाही. त्यामुळे त्यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय तेथील पक्षाच्या कार्यकर्त्यांना दोन्ही पक्षाने ज्यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे, त्यांचाच प्रचार करण्याचे आदेशही दिले आहेत. ज्या वेळी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता, त्यादिवशी जाधव आणि काळे हे उमेदवार गायब झाले होते. त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.याशिवाय प्रभाग २७ नवी पेठ – पर्वतीमधून दिलीप अरुंदेकर, अक्षदा गदादे, अनिकेत क्षीरसागर यांना उमेदवारी दिली होती. मात्र, नंतर दोन्ही पक्षांनी मिळून संयुक्तपणे धनराज जाधव (अ), दीपाली बारवकर (ब), अक्षता लांडगे (क), अशोक हरणावळ (ड) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अरुंदेकर, गदादे आणि क्षीरसागर यांना माघार घेण्याला सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी पक्षाचा आदेश ऐकला नाही. त्यामुळे त्यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.