प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह उपनगरांतील थंडीचा पारा घसरल्यामुळे किमान तापमान ७ अंशांपर्यंत खाली आले आहे. हवेली येथे सर्वांत कमी ७.८ थंडीची लाट आल्यासारखी परिस्थिती होती, तर पाषाण परिसरात ९.४ आणि शिवाजीनगर येथे ९.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून गायब झालेल्या कडाक्याच्या थंडीला सुरवात झाली आहे. शहरासह जिल्ह्यातील किमान तापमान १८ अंशाच्या पुढे गेल्यामुळे थंडी कमी झाली होती. काही भागात उन्हाचा चटका जाणवू लागला. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून किमान तापमानात हळूहळू घट होऊ लागल्याने पारा १२ अंशांपर्यंत खाली आला आणि पुन्हा थंडीची चाहूल लागली. गेल्या २४ तासांत किमान तापमानात लक्षणीय घट झाली. पारा तीन ते चार अंशांनी घटल्यामुळे आज पहाटे काडक्याची थंडी जाणवू लागली. पुन्हा एकदा पारा ७ अंशांपर्यंत खाली नोंदविला गेला. बहुतांश परिसरातील किमान तापमान १० अंशांच्या खाली आल्यामुळे हवेली परिसरासह पाषाण, शिवाजीनगर, कात्रज, धायरी, आंबेगाव, धनकवडी, सिंहगड रस्ता, वारजे, औंध याठिकाणी हुडहुडी भरणारी थंडीला सुरवात झाली. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे, तर किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यामुळे थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. शहरासह जिल्ह्यातील किमान तापमान हवेली ७.८, पाषाण ९.४, बारामती ९.६, शिवाजीनगर ९.८, तळेगाव दाभाडे १०.१, दौंड १०.४, आंबेगाव १०.७, निमगिरी १०.९, लोहगाव १४.१, चिंचवड १५.१, गिरीवन १५.३ अंश सेल्सिअस