प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून काॅग्रेस -शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे तीन पक्ष एकत्र लढणार होते. त्यासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा सुरू होती. त्यानंतर एकत्र लढण्याचा निर्णय झाला असला तरी अर्ज भरण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक असताना एबी फाॅर्म देताना तिन्ही पक्षांचा गोंधळ झाला. त्यामुळे महापालिकेस आघाडीतील या तीनही पक्षांनी १६५ जागांसाठी तब्बल २०४ उमेदवारांना एबी फाॅर्म दिले आहेत. यामुळे महाविकास आघाडीचे तब्बल ५० उमेदवार एकमेकांच्या समोर उभे राहणार असून त्याचा फायदा थेट भाजपला होण्याची शक्यता आहे. २०५ एबी फाॅर्मचे वाटप महापालिका निवडणुकीत काॅग्रेस आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यात जागा वाटप होणार होते. त्यानुसार काॅग्रेस ९० जागा लढणार होती. शिवसेनेला ७५ जागा मिळणार होत्या. शिवसेना आपल्या कोट्यातून मनसेला जागा देणार होती. मात्र, प्रत्यक्षात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काॅग्रेसकडून ९० उमेदवार, शिवसेना ठाकरे गटाकडून ७१ उमेदवार तर मनसेकडून ४४ उमेदवारांना एबी फाॅर्म देण्यात आले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे १६५ जागांवर तब्बल २०५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्ज माघारीकडे लक्ष ? महाविकास आघाडीत जागा वाटपांची चर्चा झाली होती. मात्र, कोणता पक्ष कोणत्या जागा लढविणार हे निश्चित नव्हते. त्यामुळे, तो तिढा न सुटल्याने या तीनही पक्षांनी थेट एबी फाॅर्म दिले आहेत. परिणामी, आता महाविकास आघाडीचे उमेदवार एकमेकांसमोर येणार आहेत. भाजपला रोखण्यासाठी एकत्र आलेल्या या पक्षांचे उमेदवार एकमेकांच्या समोर आल्याने त्याचा फटका महाविकास आघाडीलाच बसणार आहे. आता उमेदवारी अर्ज भरल्यानंतर इच्छुकांनी ते माघार न घेतल्यास प्रचारात मोठा गोंधळ होणार आहे. या तीनही पक्षांना आपला नेमक उमेदवार कोण हे सांगत फिरावे लागणार आहे. गुरूवारी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत तीन्ही पक्षांनी दिलेल्या एबी फाॅर्म बाबत चर्चा करून कोणत्या पक्षाने कोणत्या जागा लढायच्या आणि कोणत्या उमेदवाराने अर्ज माघारी घ्यायचे हे निश्चित केले जाईल. त्यानुसार संबधित उमेदवारांना सूचना देवून शुक्रवारी अर्ज माघारी घेतले जातील. – गजानन थरकुडे ( शिवसेना ठाकरे गट शहर प्रमुख)