पुणे : मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि अद्यापही अपूर्ण असलेल्या कात्रज–कोंढवा रस्त्याने सोमवारी आणखी एक निष्पाप बळी घेतला. इस्कॉन मंदिराजवळील धोकादायक आणि काम सुरू असलेल्या या रस्त्यावर दुचाकी व कंटेनरचा भीषण अपघात होऊन शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. पतीचे १५ वर्षांपूर्वी निधन झालेल्या या महिलेच्या अपघाती मृत्यूमुळे तिची मुलगी पूर्णपणे पोरकी झाली आहे. खडीमशीन चौकाकडून कात्रजच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मोठ्या कंटेनरच्या चाकाखाली महिला सापडली. अपूर्ण रस्ता, अरुंद मार्ग, कामामुळे निर्माण झालेले डायव्हर्शन आणि प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे अपघात अधिक गंभीर झाला. या घटनेत रमा कपाडे (वय ५३, रा. कात्रज–कोंढवा रोड) या गंभीर जखमी झाल्या. मात्र, वाहतूक कोंडीमुळे वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर आली आहे. रमा कपाडे या जे.एस.पी.एम. संस्थेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या पतीचे १५ वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्या आई आणि मुलीसोबत राहत होत्या. आईचा आधार अचानक हरपल्याने आता मुलीच्या उदरनिर्वाहाचा आणि शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, कात्रज–कोंढवा या अवघ्या साडेतीन किलोमीटरच्या रस्त्यावर गेल्या साडेचार वर्षांत ५५ हून अधिक अपघात झाले असून त्यात तब्बल २५ जणांचा मृत्यू झाला आहे. रस्त्याचे काम वर्षानुवर्षे सुरू असूनही अद्याप पूर्ण न झाल्याने हा मार्ग ‘अपघातप्रवण’ ठरत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणखी किती बळी जाणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.