प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे महापालिकेसाठी 41 प्रभागांतून 165 नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास उद्यापासून (मंगळवार) सुरुवात होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून सर्व तयारी झाली असून, पालिका आयुक्तांनी क्षेत्रीय कार्यालयानुसार 15 उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी अजूनही कोणत्या राजकीय पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही, तसेच अजून महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवायची की महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणूक लढवायची यावर कोणत्याही राजकीय पक्षांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे युती की आघाडी, याचा निर्णय झाल्यानंतर उमेदवारांची यादी राजकीय पक्षांकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्याबरोबरच सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार, नायब तहसीलदार, तसेच पालिकेचे सहाय्यक आयुक्त यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहे. निवडणुकीचे वेळापत्रक -उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी – दि. 23 ते दि. 30 डिसेंबर 2025 (सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत) -उमेदवारी अर्जांची छाननी – दि. 31 डिसेंबर 2025 -उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक – दि. 2 जानेवरी 2026 पर्यंत (दुपारी तीन वाजेपर्यंत) -निवडणुक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारी प्रसिद्ध – दि. 3 जानेवरी 2026 -मतदान – दि. 15 जानेवारी 2026 वेळ सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत -मतमोजणी – दि. 16 जानेवारी 2026