प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह उपनगरांत आज दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव पाहायला मिळाला. पहाटे उपनगरातील बहुतांश भागात धुक्यांनी व्यापला होता. परिणामी मागील आठ दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या किमान तापमानात आज एक ते दीड अंशाने घट झाली आहे. गेल्या २४ तासांत हवेली परिसरात १५ अंशावर पोहोचलेले किमान तापमान आज १३.४ अंशापर्यंत खाली आले. पुढील दोन ते तीन दिवसांत शहरासह जिल्ह्यातील हवामान बदलामुळे किमान तापमानात काही अंशी घट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली असून, शहरात थंडीचा जोर पुन्हा वाढणार.नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आणि थंडीचा पारा दहा अंशांच्या खाली आला. दि. १७ आणि १८ नोव्हेंबरला शहरात थंडीची लाट आली आणि हुडहुडी भरणाऱ्या थंडीने पुणेकर गारठले. मात्र, मागील पाच ते सहा दिवसांत ६ अंशांपर्यंत खाली आलेले किमान तापमान १५ अंशाच्या पुढे गेले. शहराच्या काही भागात कोरेगाव पार्क, वडगावशेरी, चिंचवड येथे किमान तापमान २० ते २१ अंशांवर गेल्यामुळे थंडी गायब झाली. शहरातील पाषाण, शिवाजीनगर, एनडीए, वारजे, धायरी, खडकवासला, कात्रज, हांडेवाडी यासह डोंगरभाग असलेला आणि धरणक्षेत्र परिसरात धुके आणि थंडी काही प्रमाणात जाणवत आहे. दिवसभर उन्हाचा हलकासा चटका बसत असल्याने गारव्यापासून दिलासा मिळत आहे. मात्र, आज सकाळपासून शहरात ऊन आणि ढगाळ वातावरण असून, किमान तापमानात एक ते दीड अंशाने घट झाली. हवेली परिसरात किमान तापमान १३, तर माळीण, पाषाण, शिवाजीनगर परिसरात १५ अंशांच्या आसपास किमान तापमानाची नोंद झाली. शहरासह जिल्ह्यातील आजचे किमान तापमान हवेली १३.४, माळीण १५.१, तळेगाव दाभाडे आणि पाषाण १५.५, शिवाजीनगर १५.९, दौंड १६.१, बारामती १६.२, भोर १६.५, आंबेगाव १६.६, गिरीवन १६.९, वडगावशेरी १९.५, चिंचवड १९.९, मगरपट्टा २०.३ अंश सेल्सिअस.