प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह जिल्ह्यातील किमान तापमान ६ अंशाच्या खाली नोंदविल्यामुळे थंडीचा कडाका अधिक वाढला असून, सलग चौथ्या दिवशी थंडीचा शहरात मुक्काम आहे. त्यामुळे पुणेकर गारठले असून, बहुतांश भागातील किमान तापमान एक ते दोन अंशाने घटल्यामुळे थंडीचा पारा ९ अंशाच्या खाली आले आहेत. मागील आठवड्यात किमान तापमानात अचानक चार ते पाच अंशाने वाढ झाल्यामुळे थंडीचा कडाका कमी झाला होता. गेल्या चार ते पाच दिवसांपासून थंडीचा पारा झपाट्याने खाली आला. १२ ते १३ अंशावर पोहचलेले किमान तापमान ७ ते ८ अंशापर्यंत खाली आले. परिणामी गायब झालेली थंडीची लाट पुन्हा आली असून, हुडहुडीने पुणेकर गारठले आहेत. गेल्या २४ तासात किमान तापमानात आणखीन घट झाली असून, पारा ६ अंशाच्या खाली नोंदविला. त्यामुळे थंडीचा कडाका अधिक वाढल्याने शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस शहरासह जिल्ह्यातील थंडीचा जोर वाढण्याची शक्यता असून, नागरिकांनी वाढत्या थंडीमध्ये आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. किमान तापमान हवेली ६.९, पाषाण-माळीण ७.३, बारामती ७.६, शिवाजीनगर ८.१, तळेगाव दाभाडे ८.३, दौंड ८.५, आंबेगाव ९.८, निमगिरी १०.४, हडपसर १०.६, भोर १२.१, कोरेगाव पार्क १२.४, चिंचवड १३.५, मगरपट्टा १४.८, वडगावशेरी १५.१ अंश सेल्सिअस