प्रभात वृत्तसेवा पुणे – सलग चौथ्या दिवशी शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात घट झाल्यामुळे कडाक्याची थंडीने पुणेकर गारठले आहेत. पाषाण येथे सर्वात कमी ८.१, तर शिवाजीनगर येथे ८.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. गेल्या २४ तासांत शहरातील किमान तापमानात अर्धा, तर जिल्ह्यात एक ते दोन अंशाने घट झाली. मागील चार ते पाच दिवसांपासून शहरातील किमान तापमानात लक्षणीय घट झाल्यामुळे गायब झालेल्या थंडीला पुन्हा सुरुवात झाली आहे. विशेषत: दोन दिवसांत किमान तापमानात तीन ते चार अंशाने घट झाली आणि ११ ते १२ अंशांवर असलेले किमान तापमान ८ अंशांपर्यंत खाली आले. परिणामी शहरात थंडीच्या लाटेची चाहूल लागली आणि हुडहुडी भरणाऱ्या थंडीचा अनुभव सध्या पुणेकर घेत आहेत. पाषाण, शिवाजीनगर, दौंड, बारामती, तळेगाव आणि माळीण परिसरात थंडीचा पारा ९ अंशांच्या खाली नोंदविला, तर १६ ते १७ अंशांवर गेलेले किमान तापमान आज १५ अंशांपर्यंत खाली आले. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र राहील. किमान तापमानात काही अंशी घट होण्याची शक्यता असल्याचे थंडीचा जोर कायम राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. शहरासह जिल्ह्यातील आजचे किमान तापमान पाषाण ८.१, शिवाजीनगर ८.४, दौंड ८.५, बारामती ८.६, तळेगाव ९, माळीण ९.२, आंबेगाव १०.२, निमगिरी ११.६, कोरेगाव पार्क १३.२, चिंचवड १४.२, भोर १४.८, मगरपट्टा १५.३, वडगावशेरी १५.९ अंश सेल्सिअस.