प्रभात वृत्तसेवा पुणे – लहान वयातच मुलांच्या कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेला वाव मिळावा, तसेच त्यांच्यात सामाजिक जाणीव विकसित व्हावी, या उद्देशाने सूर्यदत्त नॅशनल स्कूलमध्ये भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ४ ते २० वर्षे वयोगटांतील १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या कुंचल्याच्या साहाय्याने विविध सामाजिक विषयांवर भाष्य केले. स्पर्धेसाठी ‘सेव्ह नेचर, सेव्ह वर्ल्ड’, ‘मोबाइल व्यसनमुक्ती’, ‘शाश्वत विकासासाठी कला’ आणि ‘जीवनप्रवासाचे यशस्वी नियोजन’ असे काळानुरूप विषय देण्यात आले होते. विशेषतः मोबाइलच्या विळख्यात अडकलेले कुटुंबजीवन आणि दुसरीकडे सकारात्मक जीवनशैली यांचा विरोधाभास मुलांनी अतिशय कल्पकतेने मांडला. मानवी जीवनातील बालपण, शिक्षण, करिअर आणि निवृत्ती, असे विविध टप्पेही चित्रांमधून रेखाटले. स्पर्धेचे परीक्षण ज्योतिषतज्ज्ञ संजय संचेती, चित्रकार प्रतिभा दुग्गड, प्राचार्या कल्याणी साळुंके आणि तेजस्विनी थिटे यांनी केले. पारितोषिक वितरण समारंभाला सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल, मुख्याध्यापिका अनुपमा नेवरेकर आदी उपस्थित होते. विजेत्यांची नावे ४ ते ६ वयोगट : अमायरा पुजारी, वैदेही मोकाशी, अधिरा जंगम. ७ ते ९ वयोगट : ऐसिकी मन्ना, निशिता फौजदार, सुमेध नलवडे. १० ते १२ वयोगट : बी. लितिका, ओजल सिंग, आयांश जडिया. १३ ते १८ वयोगट : वेदिका नेमिवाल, नैशा नेगी, आदित्य राणे. विशेष पारितोषिक : भीमदेवी प्रजापती (ज्युरी स्पेशल मेन्शन). “आजच्या काळात मुलांना इंटरनेटच्या विळख्यातून बाहेर काढून निसर्ग, वाचन आणि मैदानी खेळांकडे वळविणे आवश्यक आहे. मुलांमधील सर्जनशीलता जोपासून त्यांना सकारात्मक जीवन जगण्याचे संस्कार देण्यासाठी पालक व शिक्षण संस्थांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.” – डॉ. संजय चोरडिया