Chitra Wagh | स्नेहल घुगे नावाच्या महिलेनं एका खाजगी चॅनेलवर मुलाखतीत “चित्रा वाघ यांनी मला घटस्फोट घ्यायला सांगितलं” असा दावा केला होता. या दाव्याला प्रत्युत्तर देताना चित्रा वाघ “स्नेहल घुगे नावाच्या महिलेला मी कधी भेटले नाही, बोलले नाही, कोणताही संवाद नाही. तिचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत,” असे स्पष्ट केले. चित्रा वाघ यांनी पुढे बोलताना सांगितलं की, याआधीही या महिलेने अशाच प्रकारचे आरोप केले होते. “जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न” “माझं नाव जाणीवपूर्वक घेतलं जात आहे. माझी राजकीय, वैयक्तिक प्रतिमा मलिन करण्यासाठी हा कट रचला जात आहे. मी हे सहन करणार नाही आणि मागे हटणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. “या महिलेनं हर्षदा फरांदे यांना भेटून आपल्या नवऱ्याविरोधात आणि सासरकऱ्यांविरोधात तक्रार असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी आम्ही फक्त तिला पोलिसांकडे जा, तक्रार नोंदवा एवढंच सांगितलं. घटस्फोट घे असं कधीच सांगितलं नाही. खोटे आरोप करणाऱ्या अशा महिलांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. या प्रकरणात १०० टक्के कायदेशीर कारवाई केली जाईल. मी पोलिस आयुक्तांकडे सर्व पुरावे सादर केले आहेत,” असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.