पुणे : पुण्यातील पुरू सोसायटी परिसरात आज सकाळी अकरा वाजता थार वाहनचालकाने (क्र. MH-12-WP-6186) बेजबाबदार वाहन चालविल्याने भीषण अपघात झाला आहे. दारूच्या नशेत असलेल्या चालक जितेंद्र सिंह चहल यांनी अतिवेगात आणि बेदरकारपणे थार चालवताना प्रथम समोरून येणाऱ्या वॅगनआर कारला (क्र. MH-12-JU-3087) जोरदार धडक दिली. धडकेने थारचे नियंत्रण सुटल्याने ती पुढे जाऊन टेम्पोला (क्र. MH-12-LT-4521) धडकली. या साखळी अपघातात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही किंवा जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच चतुःशृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. थार चालक जितेंद्र सिंह चहल याची अल्कोहोल टेस्ट (ड्रंक अँड ड्राईव्ह) केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही वाहने जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दारू पिऊन वाहन चालवल्याच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असल्याने पोलीस प्रशासनाने शहरात विशेष नाकाबंदी आणि चेकिंग मोहीम तीव्र केली आहे.