प्रभात वृत्तसेवा पुणे – जागतिक कीर्तीच्या पार्श्वगायिका सुनिधी चौहान यांना सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार ‘ प्रदान करण्यात आला. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांच्या हस्ते सुनिधी चौहान यांना गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, सूर्यदत्तचा स्कार्फ असे पुरस्काराचे स्वरूप होते.संगीत, गायन क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. प्रसंगी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा आदी उपस्थित होते. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, जागतिक कीर्तीच्या कलाकार असलेल्या सुनिधी चौहान यांना पुरस्कार प्रदान केल्याने पुरस्काराची उंची वाढली आहे. मुलांना प्रेरणा मिळावी, त्यांना आदर्श व्यक्तिमत्त्वांना ऐकता यावे, यासाठी ‘सूर्यदत्त’ नेहमीच नामवंत व्यक्तींना संस्थेमध्ये बोलावत असते, असेही त्यांनी नमूद केले. गेल्या दोन दशकांपासून सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनने विविध क्षेत्रांतील जागतिक स्तरावर कार्यरत अनेक मान्यवरांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरवले आहे. राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या आणि नवे मानदंड निर्माण करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवण्याचा, तसेच सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचा प्रयत्न सूर्यदत्त नेहमीच करीत असल्याचे डाॅ. चोरडिया म्हणाले.