प्रभात वृत्तसेवा पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे. परीक्षा निकोप, गुणवत्तापूर्ण वातावरणात होण्यासाठी आता राज्यस्तरीय दक्षता समिती नियुक्त करण्यात आली आहे. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय दक्षता समितीमध्ये राज्य मंडळाचे अध्यक्ष, सर्व परिक्षेत्रांचे विशेष पोलीस महानिरीक्षक, विभागीय आयुक्त कार्यालयातील अतिरिक्त आयुक्त, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालक, योजना शिक्षण संचालक, राज्य मंडळ सचिव यांचा समावेश आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा शांततेत आणि तणावमुक्त वातावरणात पार पडण्यासाठीचे वातावरण तयार करणे, राज्यभर कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवणे ही जबाबदारी राज्यस्तरीय समितीवर सोपविण्यात आली आहे. दक्षता समितीच्या सदस्यांनी परीक्षा कालावधीत केंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक आहे. जिल्हास्तरीय समितीची जबाबदारी – परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरातील छायांकित प्रतीची दुकाने बंद ठेवणे. – जिल्ह्यातील सर्व उपद्रवी, संवेदनशील केंद्राची माहिती संकलित करणे. – परीक्षेच्या एक दिवस आधी भौतिक सुविधांची खात्री करणे. – सीसीटीव्हीचे नियंत्रण जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयात ठेवणे. – सर्व खोल्यांमधी सीसीटीव्ही चित्रीकरण साठवणुकीची खात्री करणे. – उपद्रवी आणि संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेराद्वारे देखरेख ठेवणे. – भरारी पथके, बैठी पथके, पोलीस बंदोबस्त नियुक्त करणे. – गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करणे.