SPPU News – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा कारभार सध्या पूर्णतः कोलमडल्याचे चित्र समोर येत असून, विभागाच्या ढिम्म कार्यपद्धतीचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसत आहे. हिवाळी सत्र परीक्षा होऊन दोन महिने उलटूनही अद्याप अनेक अभ्यासक्रमांचे निकाल लागलेले नाहीत. मात्र, विद्यापीठाने आगामी उन्हाळी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्याने पालकांसह विद्यार्थ्यांतून संतापाची लाट उसळली आहे. पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांतील शेकडो महाविद्यालयांच्या परीक्षांची जबाबदारी असलेल्या या विभागाच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एमए, एमकाॅम, एमएसस्सीसारख्या पदव्युत्तर वर्गांचे निकाल लागून महिना उलटला तरी अनेक विद्यार्थ्यांचे निकाल संकेतस्थळावर दिसत नाहीत. निकालच माहीत नसेल, तर विद्यार्थी उन्हाळी परीक्षेचे अर्ज नेमक्या कोणत्या आधारावर भरणार? असा प्रश्नही महाविद्यालयांकडून विचारला जात आहे. अनेक विद्यार्थ्यांचे निकाल ऑनलाइन दिसत नसल्याने त्यांना फेरतपासणी किंवा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणेही अशक्य झाले आहे. विद्यापीठाने अजूनही प्रथम वर्ष व द्वितीय बीए, बीकाॅम व द्वितीय वर्ष बीएसस्सी अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केलेले नाहीत. परीक्षा बीकाॅम व बीएच्या २०१९ च्या पॅटर्नचे निकाल जाहीर झाले आहेत. मात्र, एनईपीच्या पॅटर्नचे निकाल अद्यापही प्रतीक्षेत आहेत. या परीक्षा होऊन तीन महिने झाले आहेत, तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले; पण विद्यार्थ्यांना दिसत नाही. या अनागोंदी कारभाराचा सर्वाधिक त्रास महाविद्यालयांच्या परीक्षा अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे. विद्यापीठात फोन केला, तर उपकुलसचिव किंवा सहाय्यक कुलसचिव फोन उचलत नाहीत आणि प्रत्यक्ष गेल्यास कर्मचारी दाद देत नाहीत, अशा तक्रारी समोर येत आहेत. या प्रकारामुळे आम्ही मात्र रोज विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या रोषाला सामोरे जात आहोत, अशी उद्विग्न भावना एका परीक्षा अधिकाऱ्याने व्यक्त केली. परीक्षा विभागाकडून असहकार्य परीक्षा होऊन महिला उलटला; पण निकाल नाही, तसेच पुढील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होत आहे. अशा परिस्थितीत निकाल कधी जाहीर होणार आहे, याबाबत विचारणा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक महाविद्यालयांनी पत्राद्वारे परीक्षा विभागाकडे निकालबाबत विचारणा केली आहे. मात्र, परीक्षा विभागाकडून ठोस कारण दिले जात नाही, अशा प्रतिक्रिया काही प्राचार्यांनी दिल्या आहेत. कारण गुलदस्त्यात तांत्रिक कारणांमुळे काही अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होण्यास विलंब होत असल्याचे विद्यापीठाकडून सांगितले जात आहे. एवढेच नव्हे, तर अजूनही काही अभ्यासक्रमांचे अंतर्गत गुण कसे भरायचे, याविषयी काही स्पष्टता नाही. या सर्व प्रकाराची माहिती घेण्यासाठी परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी संपर्क केला असता, त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद नाही. त्यामुळे निकालास का विलंब होत आहे, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.