SPPU News – नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन क्रेडिट गुण (श्रेयांक) देण्याच्या निर्णयावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. विद्यापीठाच्या या निर्णयाला विविध विद्यार्थी संघटनांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नाशिक कुंभमेळ्यासारख्या मोठ्या सोहळ्यात व्यवस्थापन, शिस्त आणि सेवाभावाचे धडे विद्यार्थ्यांना मिळावेत, या उद्देशाने विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन श्रेयांक देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. या निर्णयावर लवकरच अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून कुंभमेळ्यात सहभागी होण्याचे बंधन घालून धार्मिक प्रचार करू नये, असा आक्षेप संघटनांनी घेतला आहे.यासंदर्भात रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांची भेट घेतली. यावेळी दोन श्रेयांक देण्याचा विषय हा पूर्णतः ऐच्छिक होता. मात्र, विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केलेले मुद्दे लक्षात घेता, हा प्रस्ताव पुन्हा एकदा अधिकार मंडळासमोर ठेवून त्यावर सविस्तर फेरविचार केला जाणार असल्याचे आश्वासन विद्यापीठाने संघटनांना दिले आहे. कुंभमेळा नाशिक प्रशासनाच्या अपुऱ्या मनुष्यबळाची भरपाई विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणांच्या मोबदल्यात करणे चुकीचे आहे. धार्मिक कार्यक्रमांशी गुण जोडल्यास शिक्षण क्षेत्रात धार्मिकीकरणाचा धोका निर्माण होईल. विद्यापीठाने धर्मनिरपेक्षतेची परंपरा जपावी. – अक्षय जैन सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस संविधानाने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे, मात्र असे सहभाग विद्यार्थ्यांवर लादता येणार नाहीत. पालखी सोहळा किंवा गणेशोत्सवात एनएसएसचे विद्यार्थी सहभागी होतात, पण ते सर्वांसाठी बंधनकारक नसते. – विवेक बनसोडे, प्रदेशाध्यक्ष, रिपब्लिकन विद्यार्थी सेना कुंभमेळ्यामध्ये मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांना या पद्धतीने श्रेयांक देणे हे पूर्णपणे चुकीचे असून धार्मिक कामातील सहभाग हा कुठल्याही पद्धतीने त्याच्या कौशल्यामध्ये वाढ करीत नसून ते केवळ ऐच्छिक श्रमदान असू शकते. – मुकुंद किर्दत, प्रवक्ते, आम आदमी पार्टी या निर्णयाकडे धार्मिक दृष्टिकोनातून आणि संकुचितपणे कुणीही पाहू नये. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण इतर शैक्षणिक कार्यक्रमाप्रमाणे हा एक शिक्षण प्रशिक्षणाचा भाग आहे. यासाठी विद्यार्थ्यांना सक्ती नाही, देशभरातील इतरही राष्ट्रीय धार्मिक उत्सवांसाठी याप्रमाणे निर्णय घेता येईल. – सागर वैद्य, सदस्य : व्यवस्थापन परिषद, पुणे विद्यापीठ