SPPU: “मराठी ही ज्ञानभाषा होणे महत्त्वाचे आहे. नुकताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रांतील ज्ञान मराठीत भाषांतरित करण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे,” असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले. मराठी भाषा गौरव दिन आणि ज्येष्ठ कवी विष्णु वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रंथदिंडीने रंगला सोहळा – मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यापीठात भव्य ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. कुलगुरू डॉ. गोसावी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ग्रंथदिंडी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपासून मराठी विभागापर्यंत काढण्यात आली. ढोल-ताशे, टाळ-मृदुंगाच्या निनादात संतांचे अभंग गात वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे दर्शन घडवण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणी, वारकरी आणि ग्रंथदिंडी यांच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा उलगडला. कुलगुरूंसह अनेकांनी फुगड्या खेळत आणि ज्ञानोबा-तुकोबाचा गजर करत हा दिवस उत्साहात साजरा केला. उद्घाटन प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. चारुशिला गायके, मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. प्रभाकर देसाई यांच्यासह विभागातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. काव्यसंमेलनाने जिंकली मने – ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली काव्यसंमेलन पार पडले. प्रा. सुनील तोरणे, भरत दौंडकर, संतोष पावरा, सुनील जवंजाळ, डॉ. लता ऐवळे आणि दशरथ शिंदे या कवींनी सहभाग घेतला. शिक्षण, शेती व शेतकरी, आधुनिक युगातील हरवत चाललेली माणुसकी आणि प्रेम या विषयांवर कवितांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुमित साळुंखे यांनी केले तर आभार डॉ. उमेश सिरसट यांनी मानले.