प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्यात नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकांमुळे राज्यातील सर्व विद्यापीठांनी १ ते ३ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या सर्व परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्याचे निर्देश उच्च शिक्षण विभागाने दिले. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यादरम्यान होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्यातील नगरपरिषद नगरपंचायत व नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदानाच्या आधी एक दिवस व मतदानानंतर एक दिवस निवडणुकीच्या कामामध्ये कर्मचारी व महाविद्यालये यांना इतर कामे करणे शक्य होत नाही. त्यामुळे एक ते तीन डिसेंबर हा कालावधी वगळून परीक्षा घ्याव्यात, अशा सूचना राज्याचे शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सर्व अकृषी विद्यापीठांना दिल्या आहेत. त्यानुसार गुरुवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दि. १ ते 3 डिसेंबर या कालावधीतील परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.सुधारित वेळापत्रकानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्रथम वर्ष एलएलएम अभ्यासक्रमाचा 3 डिसेंबर रोजीचा पेपर 12 डिसेंबर रोजी घेतला जाणार आहे. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर अभ्यासक्रमाचा 1 डिसेंबर रोजीचा पेपर 4 डिसेंबर रोजी व 2 डिसेंबर रोजीचा पेपर 5 डिसेंबर रोजी होईल. प्रथम वर्ष इंजिनियरिंग 2019 पॅटर्नचा 3 डिसेंबर रोजीचा पेपर 13 डिसेंबर रोजी घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे कला शाखेचे मराठी, फ्रेंच, जर्मनी व उर्दू या भाषेचे तीन डिसेंबर रोजी होणारे पेपर आता 7 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.