प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांकडून एकाच जागेवर दोन उमेदवारांना एबी फाॅर्म देण्यात आल्याने छाननीच्या वेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाकडील प्रभाग ३६ (अ) मध्ये छाननीच्या वेळी शिवसेनेच्या उमेदवाराने आपल्याच पक्षाने दुसऱ्या उमेदवाराला दिलेला एबी फाॅर्म छाननीच्या वेळी हिसकावून फाडून खाऊन टाकला. त्यामुळे मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली.या प्रकरणाची गंभीर दखल घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. उद्धव कांबळे, असे या अर्ज फाडलेल्या उमेदवाराचे नाव असल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, या प्रकारामुळे चांगलाच गोंधळ उडाला असून, राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रभाग ३६ (अ) मध्ये मागील दोन दिवसांपासून उमेदवारीवरून पक्षांतर्गत कलह सुरू होता. एकाच प्रभागासाठी शिवसेना ठाकरे दोन जणांना एबी फॉर्म देण्यात आले. त्यात उद्धव कांबळे आणि मच्छिंद्र ढवळे यांच्या अर्जांचा समावेश होता. छाननीच्या वेळी दोन्ही उमेदवारांनी पक्षाचे एबी फाॅर्म दिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही अर्ज कधी आले, याची वेळ लक्षात घेवून ढवळे यांचा एबी फाॅर्म अधिकृत ठरवला आणि कांबळे यांचा एबी फाॅर्म नाकारला. त्या वेळी कांबळे वाद घालत तिथेच थांबून राहिले. काही वेळाने कांबळे यांनी ढवळे यांच्या अर्जाची टेबलवर असलेली फाइल उचलत त्यातील बी फाॅर्म फाडून टाकला व चावून खल्ला या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. हा गोंधळ लक्षात येताच पोलिसांनी कांबळे यांना ताब्यात घेतले. या प्रकारानंतर ढवळे आणि कांबळे समर्थकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत उद्धव कांबळे यांना ताब्यात घेतले. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते ससूनमध्ये सोनोग्राफी या प्रकारानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तत्काळ ढवळे यांना एबी फाॅर्मची झेराॅक्स सादर करण्याच्या सूचना दिल्या. कांबळे यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महापालिकेस सादर केला असून, कांबळे यांची ससून रुग्णालयात सोनोग्राफीही करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. या सर्व प्रकाराचे चित्रीकरणही झालेले असल्याचे ते म्हणाले.