प्रभात वृत्तसेवा पुणे – हिंजवडीसारख्या आयटी पार्कमध्ये धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. हिंजवडी ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी क्रमांक ३ मध्ये ३ ते ६ वर्षे वयोगटातील तब्बल १५ चिमुकल्यांना वर्गातच कोंडून आणि बाहेरून सेफ्टी दरवाजाला कुलूप लावून मदतनीस चक्क माजी सरंपचांच्या बैठकीला हजेरी लावण्यासाठी गेल्याची घटना घडली आहे. ही बाब जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीतून समोर आली. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.दि. २६ नोव्हेंबर रोजी हिंजवडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी क्रमांक ३ मध्ये हा प्रकार घडला. हिंजवडीचे माजी सरपंच शिवनाथ जांभूळकर यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यानुसार पर्यवेक्षिका संध्या विश्वासराव यांनी केवळ अंगणवाडी सेविकांना बैठकीसाठी पाठवले होते. मात्र, माजी सरपंचांनी सेविकांसोबत मदतनिसांनाही तत्काळ बैठकीला बोलावून घेण्याचे सांगितले. त्याप्रमाणे अंगणवाडी क्रमांक ३ च्या मदतनीस शिल्पा साखरे यांनी बालकांच्या सुरक्षेचा कोणताही विचार न करता उपस्थित १५ बालकांना अंगणवाडीतच ठेवले. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांनी बाहेरून सेफ्टी दरवाजाला चक्क कुलूप लावले आणि तेथे उपस्थित असलेल्या तीन पालकांना लक्ष देण्यास सांगून ग्रामपंचायतीमध्ये चाललेल्या बैठकीला निघून गेल्या. जरी हे अंतर १०० मीटर असले तरी, १० मिनिटे बालके आतमध्ये कोणत्याही देखरेखीविना कुलूपबंद अवस्थेत होती, अशी माहिती जिल्हा परिषदेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली. बालकांचा आक्रोश आणि पालकांचा संताप दरवाजा बाहेरून बंद झाल्याने आणि आतमध्ये कोणीच नसल्याने भेदरलेल्या चिमुकल्यांनी एकच टाहो फोडला. बालकांच्या रडण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक आणि पालक धावत आले. यावेळी उपस्थित पालक उज्वला गांगुर्डे यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांना फोन करून या गंभीर प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर गिराम यांनी मदतनीस साखरे यांना तातडीने बैठक सोडून अंगणवाडीत जाण्याचे आदेश दिले. प्रशासनाची कारवाई आणि चौकशी दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गुरुवारी विस्तार अधिकारी सुनील शेटे आणि पर्यवेक्षिका संध्या विश्वासराव यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन चौकशी केली. या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी घेतली आहे. त्यांनी याबाबतचा सविस्तर अहवाल महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.