प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीतील त्रुटींवर घेण्यात आलेल्या हरकतींसोबत ओळखीचे, तसेच नावाचे बनावट पुरावे जोडण्यात आल्याचे समोर आले आहे. महापालिकेकडे प्राप्त झालेल्या हरकतींसोबत जोडण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये तब्बल ३० टक्के हरकतींसोबत बनावट पुरावे जोडल्याची माहिती प्रशासनाच्या पडताळणीत समोर आली आहे. आधारकार्ड, मतदार ओळखपत्रे आणि वीजबिलांच्या प्रतींमध्येही फेरफार करून ती जोडण्यात आली आहेत.महापालिका निवडणुकांसाठीची प्रारूप मतदार यादी प्रशासनाने २० नोव्हेंबर रोजी जाहीर केली आहे. या यादीत मोठ्या प्रमाणात एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात जोडण्यात आल्याच्या तक्रारींचा समावेश आहे, तर या प्रारूप मतदार यादीवर तब्बल २२ हजारांहून अधिक हरकती दाखल झाल्या आहेत. हरकती नोंदविताना अर्जासोबत पुरावा म्हणून सांक्षाकित प्रत जोडणे बंधनकारक होते. काही अर्जांबरोबर जोडलेले दस्तऐवज बोगस असल्याचे निवडणूक विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या हरकती मान्य कराव्यात की नाही, असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. याबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी जोडण्यात आलेल्या प्रत्येक कागदपत्राची सखोल शहानिशा करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. तंत्रज्ञान व एआयचा वापर करून कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याच्या तक्रारीदेखील प्रशासनाकडे आल्या आहेत. त्यामुळे हरकती निकाली काढताना पुरावे खरे आहेत की नाही, हे प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासून मगच निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेमुळे महापालिकेचे कामकाज वाढणार आहे. “हरकत नोंदविताना जोडण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्ष तपासणी करताना एआयच्या मदतीने बनावट दस्तऐवज तयार केल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. याबाबत आयुक्तांशी चर्चा करून खोटे पुरावे जोडणाऱ्यांवरील कारवाईबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.” – प्रसाद काटकर, निवडणूक विभागप्रमुख